जयंत पाटील भाजपच्या संपर्कात?; चंद्रकांत पाटील यांनी दोन ओळीत विषय संपवला
BJP Leader Chandrakant Patil on Jayant Patil : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपत जाणार असल्याची चर्चा होतेय. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चंद्रकात पाटील यांनी भाष्य आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. यावर आता भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. दोन ओळीमध्ये उत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील भाजपच्या संपर्कात नाहीत. जयंत पाटील संपर्कात असले तर ते ज्या लेव्हलच्या संपर्कात आहेत, ते माझ्यासारख्याला कळणं शक्य नाही, असं चंद्रकात पाटील म्हणालेत. कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते
कोल्हापूर लोकसभेच्या निकालावरही चंद्रकात पाटलांनी भाष्य केलंय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य का कमी पडलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात आज बैठक घेतली आहे. विधानसभा मतदारसंघात आपला परफॉर्मन्स कसा चांगला करता येईल याच्यावर विचारमंथन करण्यात आलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणूक कधी होणार?
विधानसभेच्या निवडणुकी संदर्भातलं नोटेशन लवकरच निघेल. 3 नोव्हेंबरच्या आसपास नवीन विधानसभा निर्माण करावी लागेल. 20 ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील. 45 दिवस आधी प्रक्रिया सुरू होते. 5 सप्टेंबरच्या आसपास सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
संजय राऊतांच्या टीकेला उत्तर
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना माझी प्रेमाची विचारणं आहे की तुम्ही काय मिळवलत? आम्ही तिघेजण एकत्र येऊन राज्यात सरकार आणणार आहोत आणि या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहे असं संजय राऊत म्हणत आहेत. पण 2019 ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मोहापाई किंवा काही राजकीय घटना घडल्या. त्याच्यावर मात करून पुढे जायचं असतं. पण अशा घटनांमुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारून लोकांमध्ये ही इमेज केली की हे आता कडक हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात पक्ष फुटला. लोकसभेत अठराच्या जागा 9 आल्या. आता विधानसभेत 30 च जागा दिसत आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.