भाजपा नेते गोवर्धन शर्मा यांचे निधन, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाशी लढताना अखेर काल रात्री निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एक सच्चा लोकप्रतिनिधी गमवल्याची भावना अकोलेकरांची झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून त्यांना विविध पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहीली आहे.
अकोला | 4 नोव्हेंबर 2023 : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने शुक्रवारी रात्री निधन झाले. गेले अनेक दिवस ते आजाराशी लढत होते. पश्चिम अकोले मतदार संघातून अनेक वर्षे ते सातत्याने निवडून येत होते. त्यांच्या मृत्यूनंतर अकोला पश्चिम विधान मतदार संघाचे लाडके लोकप्रतिनिधी हरपल्याची भावना आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहीली आहे.
लालाजी या नावाने ओळखले जाणारे गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे अशा शब्दात भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जातीधर्मापलीकडचे नेतृत्व
तब्बल तीन दशके अकोल्यातील नागरिकांच्या मनावर राज्य करणारे भाजपाचे संवदेनशील लोकप्रतिनिधी ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याने अकोला शहर दु:खात बुडाले आहे. गोवर्धन शर्मा यांना लोक आपुलकीने लालजी म्हणायचे. लोकांच्या सुख-दु:खाच्या प्रसंगात ते सामील व्हायचे. कार्यकर्ताचे माझे कुटुंब असे ते मानायचे. त्यांचे नेतृत्व जातीधर्माच्या पलिकडे केव्हाच गेले होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आपण मुकल्याची भावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
लोकांमध्ये रमणारे नेतृत्व
अकोले पश्चिम मतदार संघातून सातत्याने निवडून येणारे गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये रमणारे, जनमाणसांशी नाळे जुळलेले व्यक्तीमत्व होते. सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असे त्यांचे नेतृत्व होते, त्यांच्या निधनाने जुन्या आणि नव्या पिढीशी उत्तम संपर्क समन्वय असलेला लोकप्रतिनिधी हरपला असून त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत गोवर्धन शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहीली आहे.
सर्वपक्षीय श्रद्धांजली
गोवर्धन शर्मा हे पश्चिम अकोला नाही तर संपूर्ण अकोला जिल्ह्याचे नेतृत्व असल्याची भावना अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे अंतिमदर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहीली आहे.