‘लाडकी बहीण योजने’बद्दल भाजप नेत्याची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, म्हणाला “दोन अपत्य असणाऱ्या मुस्लिम…”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरु केलेली लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. अनेक लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान केले.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरु केलेली लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. अनेक लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी मागणी केली आहे. “ज्या मुस्लिम कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, असे विधान नितेश राणे यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
“मुस्लिम कुटुंबात दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये ही आमची मागणी आहे. कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार नको. मात्र प्रत्येक शासकीय योजनेचा सर्वाधिक लाभ हे मुस्लिम कुटुंब घेतात. मग तुम्ही हा लाभ कशाला घेता?” असा सवाल नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
“लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थींची जी यादी आहे, त्यात जास्तीत जास्त लाभार्थी मुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करणार आहे की आदिवासी समाज वगळून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्यं असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावं”, असे नितेश राणेंनी म्हटलं आहे.
“हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल, असं म्हणत नितेश राणेंनी एका विशिष्ट समाजावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. तर नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनंतर सरकार यासंदर्भात निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.