Pankaja Munde : आपला डाव खेळणार… पंकजा मुंडे यांच्याकडून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; सावरगावात तुफान गर्दी
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भगवान गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी शेरोशायरी करत धडाकेबाज भाषणही केलं. मी महाराष्ट्राची वाघीण आहे. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे, असं सांगत त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भगवान गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी शेरोशायरी करत धडाकेबाज भाषणही केलं. या भाषणात पंकजा यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांच्या सभेसाठी तूफन गर्दी झाली होती. मी महाराष्ट्राची वाघीण आहे. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची धडाक्यात घोषण केली.
माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही, पण लोक आपसूक येतात. या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आलेत. नाशिकहून, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले आहेत. गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड कुठून कुठून लोक आले आहेत आज सभेला. सगळ्या राज्यभरातून बांधव आलेत. मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. परळीतून आम्ही धनु भाऊला तर निवडून देणारच आहोत. पण आता सगळीकडे मी येणार आहे. आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंकजा यांनी दिला.
पंकजा मुंडे कोणालाही घाबरत नाही
कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होते. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. मी मंत्री असताना विकास केला. रस्ते दिले. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नाही.
यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे. छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. मी उदयनराजेंच्या प्रचाराला गेले,. त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या खांबावर त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं आहे,असं पंकजा मुंडे म्हणाल्या.