मोठी बातमी! ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणेवरून पंकजा मुंडेंचा युटर्न? नेमकं काय म्हणाल्या?
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. यातच बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश हा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेच्या विरोधात भूमिका घेतली होती. आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अजित पवार यांच्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेबाबत रोख-ठोक वक्तव्य केलं . एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. खर सांगायचं झालं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे. सर्व नागरिकांना सोबत घेऊन नेत्यानं काम करणं अपेक्षीत आहे, त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.
मात्र आता त्यांनी या विषयावर थेट बोलणं टाळलं आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ऑन इयर कुठे बोलले आहे का? ते फक्त प्रिंटलाच आलं आहे. यावर मी लवकरच बोलेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवारांकडूनही नाराजी
दरम्यान दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी देखील या घोषणेवरून नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार मानतो, त्यामुळे अशा घोषणाला काहीही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या घोषणेवरून विरोधक देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.