शेवटचा प्रयत्नही व्यर्थ… कोल्हापुरात अखेर भाजपला मोठं खिंडार; बड्या नेत्याने कमळ हटवताच मिळाले संकेत
आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच भाजपला एक मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने महत्वाचं पाऊल उचलल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
कोल्हापूर सध्या बरंच चर्चेत आहे,तेथे मोठा राजकीय ड्रामा रंगल्याचं पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील भाजपाचा एक मोठा नेता नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्याबद्दल या चर्चा सुरू असतानाच आज त्यांनी एक मोठं पाऊल उचलल्यामुळे खळबळ माजली आहे. समरजित घाटगे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘कमळ’ चिन्ह हटवलं आहे. समजरजित सिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा असा एक नवा फोटो समरजित घाटगे यांच्या सोशल मीडियावरील वॉलवर दिसत आहे. यापूर्वी त्यांच्या वॉलवर भाजपचा फोटो होता. मात्र आता त्यांन भाजपचे कमळ हटवल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीचा मेळावा आज कोल्हापूरात पार पडला, त्यानंतर अवघ्या काहीव वेळातच समरजित घाटगे यांनी हे पाऊल उचलल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अखेर ते भाजपामधून बाहेर पडणार अशी अटकळही व्यक्त होत आहे. उद्या समरजित घाटगे यांचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ हे कागलचे विद्यमान आमदार असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याला या जागेवर महायुतीचं तिकीट मिळणार नाही, या विचाराने भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप नेत्याने भेट घेत घातली होती समजूत
विशेष म्हणजे कालच भाजपचे नेते धनंजय महाडिक हे घाटगे यांच्या घरी गेले व त्यांची भेट घेतली होती. घाटगे यांनी भाजप पक्ष सोडू नये ही विनंती करण्यासाठी धनंजय महाडिक पोहोचले. महाडिक यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, सत्यजित कदमही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. मात्र आज घाटगे यांनी कमळ हटवल्याने त्यांना अखेरचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
समरजीत घाटगे यांचं सूचक ट्विट
भाजपचे समरजीत घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय. समरजीत घाटगे यांनी मागच्या काही वर्षांपासून आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कागलमध्ये बांधणी केली आहे.
त्यामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभेत यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीत घाटगे यांच्यात सामना होऊ शकतो. “साथ जनतेची…साथ आपल्या माणसांची.. चला.. परिवर्तन घडवूया…”, असं ट्विट करत घाटगेंनी करत सूचक संकेत दिले होते.