तावडेंना घेरलं, हॉटेलमध्ये राडा, चार तास थरार; विरारमध्ये काय घडलं?
विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. साधारण गेल्या चार तासांमध्ये विरारमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या.
Vinod Tawde-Kshitij Thakur Dispute : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एक दिवस शिल्लक आहेत. मतदानासाठी काही तास शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे हे अडचणीत आले आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यानंतर विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. साधारण गेल्या चार तासांमध्ये विरारमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या.
नेमकं काय घडलं?
विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ही घटना घडली. यात बविआच्या हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यानंतर बविआचे अनेक कार्यकर्ते आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला
विनोद तावडे हे भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारी यांना घेऊन मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांच्याकडे काही रक्कमही सापडली. यावेळी बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
डायरीत पैशांची नोंद
यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. बविआ कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर विनोद तावडे हे रुममध्ये निघून गेले. यावेळी तिथे असलेल्या एका बॅगमध्ये काही डायरी सापडल्या. या डायरीत विनोद तावडे यांच्याकडे सापडलेल्या काही डायऱ्यांमध्ये पैशांच्या नोंदी आहेत. तो आकडा १५ कोटी रुपयांच्या घरात जातो, असा दावा ठाकूर यांनी केला. वसई रोड ५, विरार पश्चिम ४ आणि नालासोपारा ५ अशा नोंदी ठाकूर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवल्या आहेत.
हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?
विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती मला भाजपने दिली. मला वाटलं राष्ट्रीय स्तरावरील नेता अशा लहानसहान गोष्टी करणार नाही. पण आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो, तर इथे तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. इतक्या मोठ्या नेत्याला लाज, शरम काही नाही. मतदारसंघ ४८ तासांआधी सोडायचा असतो. इतकी साधी माहिती यांना नाही आणि हे शिक्षण मंत्री होते, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.
विनोद तावडे काय म्हणाले?
या घटनेनंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. “पोलिसांनी चौकशी करावी. सीसीटीव्हीची चौकशी करा. मी 40 वर्षापासून राजकारणात आहे. अप्पा ठाकूर मला ओळखतात, क्षितीज यांनाही माहीत आहे. सर्व पक्ष मला ओळखतात. वास्तव स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, असे विनोद तावडे म्हणाले. या प्रकरणानंतर विनोद तावडे, हिंतेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजन नाईक यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी काय घडलं याबद्दल सांगण्यात आले. यानंतर ठाकूर पिता-पूत्र आणि विनोद तावडे हे एकत्र जेवायला निघून गेले.