मराठा समाजाची नाराजी भाजपला भोवेल का? बड्या नेत्याचे विधान
येत्या २० नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडत आहे. तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. सध्या प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने एक मोठे विधान केले आहे.
Vinod Tawde On Maratha Reservation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडत आहे. तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. सध्या प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले. विनोद तावडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखत दिली.
विनोद तावडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना मराठा आरक्षणासह मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना मराठा आरक्षणाचा भाजपला फटका बसेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवरही टीका केली.
“आरक्षण विषयात माझं मत असं आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण आंदोलन करताना भाजपला का दोष?” असा रोखठोक सवाल विनोद तावडे यांनी उपस्थित केला. मनोज जरांगेंनी उमेदवार दिले नाही. त्यामुळे आम्हाला मराठा समाजाचा फटका बसेल असं वाटत नाही, असाही विश्वास विनोद तावडेंनी व्यक्त केला.
“मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे”
“मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवायचं नाही ठरवल्याने विषय खाली बसला. आरक्षण विषयात माझं मत असं आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण आंदोलन करताना भाजपला का दोष. राज्यात १९६५मध्ये आरक्षण सुरू झालं. १९८० मध्ये अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण मागितलं. मंडल आयोगात मराठा समाजाला घालता आलं असतं, पण शरद पवार यांनी होऊ दिलं नाही. पण नंतर भुजबळांनी दबाव टाकला. त्यानंतर पवारांनी ओबीसींचं आरक्षण वाढवलं. त्यानंतर बापट आयोग आला. भोईटे सदस्या होत्या त्यांना अटॅक आला. त्या गेल्या नाही. त्यामुळे अध्यक्षांनी विरोधात मतदान केलं. आरक्षण फेटाळलं गेलं”, असे विनोद तावडे म्हणाले.
“मराठा समाजाचा फटका बसेल असं वाटत नाही”
आम्ही १३ टक्के आरक्षण दिलं. पण ठाकरे सरकारने पुढे काही केलं नाही. १९६५ नंतर आरक्षण भाजपनेच दिलं. मग भाजपला का दोष देत आाहत. शरद पवार आणि काँग्रेसवर जरांगे बोलत नाही. पण आम्ही आरक्षण दिलं आणि हायकोर्टात टिकवलं. त्यांना का बोलत आहात. पण जरांगेंनी उमेदवार दिले नाही. त्यामुळे आम्हाला मराठा समाजाचा फटका बसेल असं वाटत नाही, असे विनोद तावडेंनी म्हटले.