…म्हणून वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं खरं कारण
आता वाल्मिक कराड हा परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. आता यावर भाजपच्या एका मंत्र्याने भाष्य केले आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता वाल्मिक कराड हा परळीतील लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. आता यावर भाजपच्या एका मंत्र्याने भाष्य केले आहे.
दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचे अध्यक्ष पद अजूनही कायम आहे. तो परळीतील लाडकी बहीण योजनेच्या समिती पदावर अजूनही कायम आहे. आता यावर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते पुण्यातील मावळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाल्मिक कराडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विरोधकांनी यावर राजकारण करु नये, असा सल्ला दिला. याप्रकरणी “सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकार योग्य ती कारवाई करत आहे. चौकशी करत आहे, त्यामुळे आरोपीला लवकरच शिक्षा मिळेल”, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.
“हे सरकार कारवाई करत आहे”
“माझी सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकरणावर राजकारण करू नये. शासनाने केलेली कारवाई आणि पूरक असलेल्या गोष्टी सरकारकडे दिल्या पाहिजेत. सरकारने या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे हे सरकार कारवाई करत आहे. अनेक चौकशा लावल्या आहेत”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणून…
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घातलं आहे. ते शेवटपर्यंत याप्रकरणात लक्ष देतील. पण शेवटी आरोपीला शिक्षा भेटणारच. वाल्मिक कराडने चांगलं काम केलं म्हणून त्याला ते पद मिळालं असेल. जर चुकीचं काम केलं असेल तर त्याला योग्य ते शासन, शिक्षा झाली पाहिजे. ही सरकारची भूमिका आहे”, असेही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले.