भाजप आमदार नितेश राणे क्रिकेटच्या मैदानातही आक्रमक, पत्रकार विरुद्ध राजकारणी सामन्याची मागणी
भाजपचे कोकणातले एकमेव आमदार नितेश राणे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांची आक्रमकता ही फक्त राजकीय पटलावरच नसून खऱ्या खुऱ्या मैदानातही अनुभवायला मिळाली.
सिंधुदुर्ग : भाजपचे कोकणातले एकमेव आमदार नितेश राणे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांची आक्रमकता ही फक्त राजकीय पटलावरच नसून खऱ्या खुऱ्या मैदानातही अनुभवायला मिळाली. निमित्त होत सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचं. या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं. उद्घाटन झाल्यानंतर आमदार नितेश राणे बॅट घेऊन स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं (BJP MLA Nitesh Rane play Cricket with journalist in Sindhudurg).
आक्रमक वक्तव्य करणारे नितेश राणे हे मैदानातही तेवढेच आक्रमक आहेत. त्यांचा हा आक्रमकपणा सिंधुदुर्ग नगरीतील पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत दिसला. यावेळी प्रदर्शनीय खेळ करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नितेश राणे यांनी आक्रमक फलंदाजी करत उपस्थितांची वाहवा मिळवली. आमदार राणे यांचा स्वभाव जसा आक्रमक आहे तसाच आक्रमकपणा किक्रेटच्या मैदानातही दिसला.
काही पत्रकारांनी नितेश राणे यांना बॉलिंग करताना गुगली टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एखादा हल्ला कसा परतवून लावायचा यात वाकबगार असलेल्या राणेंनी प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यांची मैदानातली तुफान फटकेबाजी पाहून सर्वांनीच तोंडात बोटं घातली. निष्णात क्रिकेटपटू प्रमाणे ते प्रत्येक चेंडू टोलावत होते. प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाज बदलला जात होता, मात्र फलंदाज आपला आक्रमकपणा कायम ठेवून होता.
नितेश राणे यांनी या क्रिकेट सामन्यातील एकही चेंडू मागे सोडला नाही. अखेर स्वतःहून बॅट खाली ठेवत त्यांनी मैदान सोडलं. खरंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांचं क्रिकेटवरच प्रेम सर्वश्रुत आहे. याआधी कित्येकदा त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे यांना क्रिकेटच्या मैदानात पाहिलं गेलंय. तेही चांगले क्रिकेटपटू आहेत. पत्रकारांच्या या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील राजकारणी आणि पत्रकार यांचा एक सामना आयोजित करण्याची विनंती पत्रकार संघाला केली आहे. तसेच या निमित्ताने तुम्हाला आमचं अंदर (आतून) किती अंडरस्टँडिंग असतं हे कळेल, असाची सूचक टोला लगावला.
हेही वाचा :
“बिग सॅल्यूट टू आवर होम मिनिस्टर अमित शाह जी”, भाजप आमदाराचं खास ट्विट
ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच
व्हिडीओ पाहा :
BJP MLA Nitesh Rane play Cricket with journalist in Sindhudurg