मनोज जरांगे, हिंमत असेल तर राहुल गांधी यांचा बुरखा फाडा – प्रसाद लाड यांचे आव्हान
मनोज जरांगे पाटील हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे. राहुल गांधी हेदेखील फडणवीसांचा माणूस आहेत असं जरांगे म्हणतील का असा प्रश्नही लाड यांनी उपस्थित केला
मनोज जरांगे पाटील हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे. राहुल गांधी हेदेखील फडणवीसांचा माणूस आहेत असं जरांगे म्हणतील का असा प्रश्नही लाड यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.
काय म्हणाले प्रसाद लाड ?
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश् विचारत त्यांना आव्हानही दिले. ‘ राहुल गांधींची विदेशात जी भूमिका आहे. संविधान आम्ही संपवणार असं नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीदरम्यान सेट करण्यात आलं. आज काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधी यांच्या तोंडून स्पष्टपणे देशा समोर आली आहे. या माध्यमातून राहुल गांधी आणि मनोज जरांगे पाटील यांनाही विचारायचा आहे. आता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार आहेत का ? ते महाविकास आघाडीचा चेहरा, बुरखा फाडणार का ? का पुन्हा एकदा म ची बाधा टाकून , महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधी यांची साथ देणार आहेत ?’ असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला.
‘ जर आरक्षण रद्द झालं तर ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने संघर्ष केला, मराठ्यांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधी यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेणार का ? ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं, तरीही त्यांना शिव्या, शाप दिल्या. आता मनोज जरांगे काय म्हणणार ? राहुल गांधी देखील देवेंद्र फडवणीस यांचा माणूस आहे, असं ते म्हणणार का ?’
नाहीतर तुमचं बेगडी प्रेम…
मनोज जरांगे पाटील, हिंमत असेल तर पुढच्या दोन तासांत पत्रकार परिषद घ्या, राहुल गांधींचा बुरखा फाडा. तर आम्ही समजू की तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात, खरे मराठ्यांचे नेते आहात. नाहीतर तुमचं बेगडी प्रेम, तुमचं मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल आणि तुमचा चेहरा समोर येईल. तुमचा बुरखा फाडायचा नसेल तर राहुल गांधी आणि महाविकास आघआडीविरोधात भूमिका घेऊन तुम्हाला त्यांचा बरुखा फाडावा लागेल ‘ असे आव्हानही प्रसाद लाड यांनी दिले.