शिवशक्ती कुठे आहे? आंबेडकर यांनी किती घरं बसवली? वंचित-ठाकरे गटाची युती होताच राणे यांचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलाय.
प्रदीप कापसे, पुणेः राज्याच्या राजकारणात आज नवं समीकरण जुळून आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा झाली. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याने राजकारणात नवी लाट येणार असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलाय.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना नारायण राणे म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आबंडेकर याचं अस्तित्वच काय आहे? राज्यात आता शिवशक्ती कुठं राहिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे १२ देखील आमदार राहिले नाहीत…
मोदींवर टीका करण्याची लायकी नाही…
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीचीा घोषणा करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही एक दिवस अंत होईल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. यावरून नारायण राणे यांनी या दोन्ही नेत्यांना सुनावलं. मोदींवर टिका करण्याची या दोघांची लायकी नाही.. राज्यात शिवशक्ती तर नाहीच. भीमशक्ति देशात आहे पण प्रकाश आंबेडकरकडे किती आहे? त्यानं किती दलितांची घरं बसवली ? मी सांगतो मी किती जणांची घरं बसवली… असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं.
शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात काहीही फऱख फढणार नाही, अशी स्पष्टोक्ती नारायण राणे यांनी केली.
शिवसेनेशी युती, महाविकास आघाडीचं काय?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली. मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशीही वंचित बहुजन आघाडीची युती झालीय का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती होणार असेल तर आम्ही स्वागत करू, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र शिवसेना-वंचित युतीवर काल बोलणं टाळलं. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.