बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही महिन्यात 2 वेळा मराठवाड्यात गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहकारमंत्री अतुल सावेही यांचीही उपस्थिती होती. पण या कार्यक्रमात ज्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली त्या म्हणजे पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे. यामुळे पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच पंकजा मुंडेंची ही वादळापूर्वीची शांतता आहे का? पाहुयात एक रिपोर्ट.
पंकजा मुंडेंना भाजपमध्ये डावलण्यात येतंय का? पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आले होते. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला पंकजा मुंडे गैरहजर होत्या.
एवढंच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला नाव नसूनही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या होत्या.
आजही पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानं पंकजा नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडें शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. पंकजा मुंडेंसाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे असल्याचंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं होतं. पण फडणवीसांनी या चर्चा खोडून काढल्या होत्या.
पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांनीही प्रतिक्रिया दिलीय. भाजपसाठी पंकजा मुंडेंचं मोठं योगदान असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय.
गोपीनाथ मुंडे सारखे नेत्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा बोलबाला झाला. नाराज होऊन पंकजा मुंडे काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. सत्ता येथे जाते पद मिळतात मिळत नाही मात्र पक्षासाठी पंकजा मुंडे यांच योगदान मोठं आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाला.
आपल्याला पक्षात डावललं जात असल्याची भावना पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण यावर थेट बोलणं मात्र पंकजा मुंड़ेंनी टाळलंय. अनेक दिवसांपासून पंकजा शांत आहेत. त्यामुळं त्यांची ही शांतता वादळापूर्वीची शांतता तर नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय.