एक्झिट पोलनंतर आता भाजप अॅक्शन मोडमध्ये, नेत्याची पक्षामधून तडकाफडकी हकालपट्टी
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, त्यानंतर लगेचच एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. एक्झिट पोलनंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये आलं असून नेत्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, त्यानंतर लगेचच एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. अनेक संस्थांच्या एक्झिट पोलनुसार यावेळी राज्यात कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाहीये, भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरणार असला तरी देखील गेल्यावेळी त्यांना 105 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी त्यांच्या जागांचा आकडा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे एक्झिट पोलनुसार आता महाविकास आघाडी आणि महायुती यांना समान संधी असू शकते अशी चर्चा आहे. दरम्यान हे सर्व सुरु असतानाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
गोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तेजेंद्र हरिणखेडे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत गोरेगांव तालुका भाजपचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तेजेंद्र हरीनखेडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत तालुकाध्यक्ष संजय बारेवार यांनी आदेश काढले आहेत. गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजप पक्षाच्या वतीने उमेदवार विजय रहांगडाले हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, मात्र उपसभापती तेजेंद्र हरीणखेडे यांनी पक्षाविरोधी कारवाई करत त्यांचा प्रचार केला नसल्याचा आरोप आहे, त्यामुळे एक्झिट पोलच्या दुसऱ्याचं दिवशी तेजेंद्र हरिणखेडे यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?
काही एक्झिट पोलच्या मते महायुतीला काठावरचं बहुमत मिळताना दिसत आहे, तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात शिवसेना सेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या तुलनेत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागा अधिक येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गेल्यावेळी भाजपनं एकूण 105 जागा जिंकल्या होत्या, यावेळी त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत.