भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’… प्रकाश आंबडेकर यांचा थेट सवाल, मग तुम्ही मुसलमान…
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान आहे का? पंतप्रधान कोण आहे? आर्मी प्रमुख कोण आहे? तो ही मुस्लीम आहे का? देशातील सर्वच मुख्य पदे हिंदुंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा?
धाराशिव | 24 जानेवारी 2024 : भाजप नेहमीच ‘हिंदू खतरे में’ असा कांगावा करतात. आजही तेच सांगतात ‘हिंदू खतरे में आहे. कसला खतरे में है? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान आहे का? पंतप्रधान कोण आहे? आर्मी प्रमुख कोण आहे? तो ही मुस्लीम आहे का? देशातील सर्वच मुख्य पदे हिंदुंकडे असल्यानंतर धर्म धोक्यात कसा? अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केली. ‘तुम्ही सर्व जण मुसलमान होणार का? तुम्ही मुसलमान होणार नसाल तर धर्म कशाने धोक्यात आला? तुम्ही वडिलांचा धर्म मानता मग धोका कसला असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
धाराशिव येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बोलत होते. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेबांच्या चळवळीने समता विचार पुढे आला. तो त्यांना उद्ध्वस्त करायचा आहे. त्यांना मनुवाद सुरू करायचा आहे. आमचा कोणत्याही धर्माला, देवीला विरोध नाही. आम्ही समता विचार घेऊन पुढे जात आहोत. आरक्षणाच्या माध्यमातून समता सुरू झाली आहे. आम्ही आरक्षणवादी आहे. त्यामुळेच आमचं मत आरक्षणवाद्यांनाच असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तुम्ही सत्तेच्या केंद्रात नसाल. संधी मिळाली तेव्हा ओबीसीतून कुणालाही बसवलं नाही. ओबीसी उमेदवारांच्या बाजूने तुम्ही उभे राहिला नाही तर संदेश काय जाईल? जो आरक्षण विरोधी होता त्याला तुम्ही मतदान कराल. लोकांच्या माध्यमातून व्यक्त होणारं मत लोकांचं मत मानलं जातं. त्यामुळे तुमचं मत हे आरक्षणवादी आहे, हे दाखवून देण्यासाठी ओबीसी उमेदवार निवडून द्यावे लागतील, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ओबीसी समाजातील प्रत्येकाचे मत हे यापुढे आरक्षणवाद्यालाच असलं पाहिजे. दुसरं कुणालाच नाही. कोणता पक्ष आरक्षणवादी आहे. त्याची टेस्ट तुम्हाला सांगितली. निकष सांगितला. जो पक्ष १२, १३, १५ ओबीसी उमेदवार देईल त्यालाच मतदान करू. तोच पक्ष आरक्षणवादी आहे अशी भूमिका असली पाहिजे असे ते म्हणाले.
एका राजकीय पक्षाने ओबीसी उमेदवार दिला नाही, त्याला मतदान केलं तर याचा अर्थ आम्हाला आरक्षण नको. मी आरक्षणवादी नाही हेच त्यातून सूचित होतं. आज आपण रस्त्यावर येऊन बसलो आहोत. आरक्षणासाठी बसलो आहोत. त्यामुळेच आरक्षणवादी पक्षाला आणि ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा असे ते यावेळी म्हणाले.