भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अजित पवार यांच्यावर विश्वास, म्हणाले यांचाही लवकरच पक्षप्रवेश…
भाजपकडे विषय नाही, अजित पवार यांच्याकडे काही चर्चा नाही. पण, माध्यमांमध्ये चर्चा आहे. अजित पवार यांची जी काही सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा आहे ती जाईल असे आम्ही काही करणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चाना अखेर अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. अन्य पक्षात जाण्याचा माझ्या मनात कसलाही विचार नाही. या चर्चा कोण पसरवत आहेत ते मला माहित नाही असे स्पष्ट केले. दोन दिवस या चर्चा सुरु आहेत. पण त्यावर मौन बाळगून असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषद घेत आपले मौन सोडले. जे लोक देव, देश आणि धर्म संस्कृतीकरता तसेच मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे येण्यासाठी जे सोबत येतील त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही असे स्पष्ट केले.
अजित पवार भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरु आहे. पण तसा कोणताही विचार, प्रस्ताव भाजपकडे आलेला नाही. भाजपकडे विषय नाही, अजित पवार यांच्याकडे काही चर्चा नाही. पण, माध्यमांमध्ये चर्चा आहे. अजित पवार यांची जी काही सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा आहे ती जाईल असे आम्ही काही करणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाचा आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आमच्यासमोर किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून आमच्यासमोरही आलेला नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, कधी काळी ते आमच्यासोबत आले होते. पण जे झाले ते झाले. त्याच आधारे त्यांना बॉक्समध्ये उभे करणे हे काही योग्य नाही.
अजित पवार यांनीही तो त्या काळातला निर्णय होता असे सांगितले होते. आता तो काळ गेला. त्यामुळे त्यावेळेचे आता काढून त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उभे करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट काय बोलले, अजित पवार काय बोलले याची आपणास माहिती नाही. या ज्या काही चर्चा सुरु आहेत त्या बाहेरच्या बाहेर आहेत. अधिकृतपणे असा कोणताही प्रस्ताव नाही. कुणाचा जीवनात जर आणि तरला काहीच अर्थ नसतो.
भाजपने २०४७ चा विचार केला आहे. जगातला सर्वोत्तम देश कोण करू शकतो तर ते मोदी करू शकतात या जनतेला विश्वास आहे. त्यामुळे आम्हला समर्थन मिळत आहे. येत्या काळात पक्षप्रवेशाची मोठी यादी आमच्याकडे आहे. त्यामुळे अशा चर्चेमुळे काही फरक पडत नाही. सरकारच्या विकासाच्या कामावर आम्ही पुढे जात आहोत, असेही त्यांनी सांगितले.