महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं…
राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुखमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदा राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही कडून देखील महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार याबाबत दावा केला जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीचे प्रमुख घटक पक्ष आहेत. सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून, एकनाथ शिंदे हे मुख्यंत्री आहेत. दरम्यान पुन्हा एकदा जर राज्यात महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो, आमच्या जास्तीत जास्त जागा महायुती म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागा याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महायुतीचं सरकार यावं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही चढाओढ नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहोत, मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. नाना पटोले हे सध्या शोले पिक्चरच्या असराणीच्या भूमिकेत आहेत, सगळे इकडे तिकडे गेले आहेत, त्यांच्यासोबत कोणी राहिलं नाही, त्यांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील त्यांनी निशाणा साधला.
खरगे यांना विचारायला पाहिजे की लाडकी बहिणी योजना चुकीची आहे का?, वीजबिल माफ केलं तेही चुकीचा आहे का? ते सर्वच योजनेबद्दल चुकीचं आहे असं म्हणतात, आता महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.