भाजप 30 विद्यमान आमदारांची तिकीटं कापणार?
लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापल्यानंतर, आता भाजपने आपला मोर्चा विद्यमान आमदारांकडे वळवला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापल्यानंतर, आता भाजपने आपला मोर्चा विद्यमान आमदारांकडे वळवला आहे. पाच वर्षात सुमार कामगिरी करणाऱ्या आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. सुमार कामगिरी करणाऱ्या एक-दोन नव्हे तर जवळपास 30 विद्यमान आमदारांचं तिकीटा कापण्यात येणार आहे.
भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. शिवाय युती करताना ठरलेल्या अटीनुसार दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरल्यामुळे दोन्ही पक्ष 144-144 जागा लढवणार आहेत.
या फॉर्म्युल्यामुळे भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुन त्यांची तिकीटं धोक्यात आली आहेत.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता. आता या माजी मंत्र्यांना भाजपकडून तिकीटं दिली जातात की नाही हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या
15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : चंद्रकांत पाटील