हातात काठी, औरंगाबाद नावाची तोडफोड, संभाजीनगरात महिला पदाधिकाऱ्याचा Video व्हायरल
औरंगाबाद शहराच्या छत्रपती संभाजीनगर नामांतराला समर्थन करण्यासाठी सकल हिंदु संघटनांनी रविवारी विराट मोर्चा काढला. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत औरंगाबाद नावाचा तीव्र निषेध नोंदवला.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगगर (Sambhajinagar) झाल्यानंतरही शहरातील परस्पर विरोधी संघटनांमधील मतभेदांची धग कमी होत नाहीये. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधी आंदोलन मागे घेतल्यानंतरही शहरातील हिंदु संघटनांनी आक्रमकता दाखवली. शनिवारी मनसेच्या वतीने रविवारी तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. संभीजनगर नामांतर झाल्यानंतरही अनेक ठिकाणी अजूनही औरंगाबाद नावाचे बोर्ड आहेत. ते बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र औरंगाबाद नावावरचा रोष दर्शवण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. यातच एक भाजपच्या महिला नेत्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हातात काठी घेऊन या नेत्याने शहरातील औरंगाबाद नावाच्या बोर्डची तोडफोड केल्याचं या व्हिडिओत दिसतंय.
कोण आहेत या पदाधिकारी?
हातात काठी घेऊन औरंगाबाद नावाची तोडफोड करणाऱ्या या आहेत भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण. सिडको परिसरातील आय लव्ह औरंगाबाद या नावाची त्यांनी तोडफोड केली. तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तू दुर्गा, तू भवानी, तूच जननी या गाण्यावर अनुराधा चव्हाण यांचा तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
हिंदु जनगर्जना मोर्चा
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ शहरात रविवारी हिंदू संघटनांनी मोठा मोर्चा काढला. क्रांती चौकातून औरंगपुऱ्याच्या दिशेने हा मोर्चा निघाला. त्यानंतर महात्मा फुले चौकात जाहीर सभा घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि सातारा येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्यासह सुनील चव्हाण, शिरीष बोराळकर, शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, विनोद पाटील, मनसेचे सुमित खांबेकर आदी नेत्यांची भाषणे झाली. छत्रपती शिवरायांचे विचार नाकारणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नाही, असे मत आमदार राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त केलं.
बॅनर्स, पोस्टर्सची फाडाफाडी
या मोर्चातील काही पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद नावाचे पोस्टर्स आणि बॅनर्सची फाडाफाडी केली. पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. उस्मानपुरा येथील झाशीची राणी पुतळ्याजवळ तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.