Chitra Wagh | ‘किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई…’ कथित अश्लील व्हिडिओवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
Chitra Wagh | रुपाली चाकणकर आणि त्या एकाच सरकारमध्ये असणार आहेत, त्या बद्दलही त्यांनी भाष्य केलं. रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
कोल्हापूर : भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्या नावाची मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहे. चित्रा वाघ या महिलांचे प्रश्न, त्यांचे विषय लावून धरण्यासाठी ओळखल्या जातात. मागच्या आठवड्यात महिलांसंबंधीचे अनेक महत्वाचे विषय समोर आलेत. अनेक दिवसांपासून जळत असलेल्या मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. जमावाने महिलांना विवस्त्र करुन फिरवलं, त्यांच्यावर बलात्कार झाला.
संपूर्ण देशातून या घटनेचा निषेध करण्यात येतोय. या निंदनीय कृत्यावर संतापजनक पडसाद उमटत आहेत. सरकारविरोधाता नाराजीची, रोषाची भावना आहे.
चित्रा वाघ कुठे आहेत?
त्याशिवाय महाराष्ट्रातही एका भाजपा नेत्याच प्रकरण समोर आलय. माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय. विधिमंडळात मंगळवारी त्यावरुन जोरदार पडसाद उमटले. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ आणि मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार या दोन घटनांनंतर चित्रा वाघ कुठे आहेत? असा प्रश्न विचारला जात होता.
मणिपूर घटनेवर चित्रा वाघ काय म्हणाल्या?
या प्रकरणात आता चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मणिपूरच्या घटनेचा मी निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. कारण राहुल गांधी हे संसदेत नाहीत, त्यामुळे याचं राजकारण केलं जातय. सगळ्यांनी मिळून अशा घटनेला विरोध केला आहे. मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
‘कुणी ताई समोर आली पाहिजे’
“मी इथेच आहे कुठेही गेलेली नाही. किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे. जो प्रकार झाला तो चुकीचा झालाच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
रुपाली चाकणकर आणि त्या एकाच सरकारमध्ये त्यावर काय मत?
“आम्ही अजितदादा यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्याचं आम्ही स्वागत केलं. रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही. जिथं गोष्टी मनाला पटत नाही तिथं आम्ही बोलून दाखवू” असं चित्रा वाघ म्हणाल्या. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झालं ते नवीन नाही. ते होणारच होतं, कधी होणार हे फक्त माहीत नव्हतं. पण झालं आता” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.