“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या पुण्यातीलअनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.ठाकरे गटाच्या या पदाधिकाऱ्यांना भाजपात घेतल्याने भाजपाचे मूळ कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले असून ही नाराजी आता पोस्टर्स आणि बॅनरवर दिसत आहे.
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मोठी गळती लागली आहे. या राज्यात आता लवकर महानगर पालिका,पालिका, जिल्हा परिषदच्या रखडलेल्या निवडणूका होऊ घातल्या असताना सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील पुणे येथील नगरसेवक भाजपात गेल्याने एकीकडे त्यांचे जोरदार स्वागत झाले. तर निष्ठावान कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.
पुण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थित ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला आहे. दुसरीकडे मात्र या प्रवेशाने नाराज झालेल्या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पुणे येथे फ्लेक्स उभारले आहेत. या बॅनर पॉलीटीकल कमेंट करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने भाजपातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील खदखद आता ‘राजकीय फ्लेक्स’ द्वारे बाहेर आली आहे.ज्यांनी गेली पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका तसेच विरोधात आंदोलने केली, तेच लोकआता आपलं घर वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत असल्याची टीका होत आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट फ्लेक्स उभारत आपली नाराजी जाहीर केली आहे.
काय लिहीलंय फ्लेक्सवर !
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांनी अभिनव पद्धतीने फ्लेक्स उभारले आहेत. त्यावर “दुश्मनी जमकर करो… दुश्मनी जमकर करो… लेकिन यह एहसास रहे, जब दोस्त बनजाये तो शरमिंदा ना हो…” असा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे सेनेतील नगरसेवकांचा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला आहे. यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट यांनी भाजपात प्रवेश केला आहे. परंतु दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांत यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे.