बोरिवलीसाठी रस्सीखेच, सुनील राणेंचा पत्ता कापणार; तिकीट कुणाला?
भाजपने बोरिवली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात उशीर केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, शरद साटम आणि स्नेहल शाह यांची नावे सध्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. भाजपचा हा सर्वात सेफ मतदारसंघ असला तरी राणे यांच्या विरोधात असंतोष असल्याने पक्ष नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.
भाजपने एकूण 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आलं आहे. काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, तिकीट जाहीर न करता बोरिवली विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट अजून जाहीर करण्यात आलं नाही. राणेंचा पत्ताकट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी चार जण इच्छुक आहेत. स्नेहल अमृतलाल शाह हे या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
बोरिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत सुनील राणे यांचं नाव आलं नाही. त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. सुनील राणेंऐवजी गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, शरद साटम आणि स्नेहल शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
सर्वात सेफ मतदारसंघ
बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गुजराती मतदार सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल मराठी आणि उत्तर भारतीय मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. पण मतदारसंघात सर्वाधिक प्राबल्य गुजराती भाषिक मतदारांचं आहे. भाजपने या मतदारसंघात कुणालाही तिकीट दिलं तरी ती व्यक्ती निवडून येते इतका हा सेफ मतदारसंघ आहे. सुनील राणे हे वरळीचे रहिवासी आहेत. त्यांना वरळीतून बोलावून बोरिवलीत तिकीट दिलं. राणे यांचा बोरिवलीशी काडीचाही संबंध नव्हता. तरीही ते निवडून आले. यावरून हा मतदारसंघ किती सेफ आहे हे दिसून येतं. पण गेल्या पाच वर्षात राणे यांच्याविरोधात मोठा असंतोष बोरिवलीत निर्माण झाला आहे. त्यांच्याबद्दलचा निगेटिव्ह अहवाल पक्षाकडे आला आहे. त्यामुळेच या मतदारसंघात दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
चार नावे चर्चेत, कोण आघाडीवर?
बोरिवली मतदारसंघात ज्या चार इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी स्नेहल शाह यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. गोपाळ शेट्टी हे माजी खासदार आहेत. त्यामुळे खासदार राहिलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यापेक्षा स्थानिक उमेदवाराला अधिक प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्नेहल शाह हे गुजराती आहेत. ते महाराष्ट्राच्या जैन सेलच्या प्रदेश ज्वॉइंट सेक्रेटरी आहेत. गुजराती जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. हा मतदारसंघ गुजराती बहुल असल्याने यावेळी गुजराती व्यक्ती म्हणूनही स्नेहल शाह यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
कोव्हिड काळात उल्लेखनीय काम
या मतदारसंघात आदिवासी, बौद्ध, जैन, गुजराती, दलित आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारांनी पत्र लिहून स्नेहल शाह यांना पाठिंब दिल्याचं सांगितलं जात आहे. स्नेहल अमृतलाल शाह यांनी कोव्हिड काळात गरीबांची प्रचंड मदत केली होती. ते असंख्य गोशाळाही चालवतात. गुजराती असूनही आदिवासी, उत्तर भारतीय, हिंदू, बौद्ध आणि दलित समाजात त्यांची चांगली लोकप्रियता आहे. शिवाय ते स्थानिक आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी मजबूत असल्याने त्यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. पण या चारही उमेदवाराच्या रेसमध्ये भाजप कुणाच्या हाती बोरिवलीची सूत्रे देणार हे पाहावं लागणार आहे.