दर 15 ते 30 सेंकदाला पॉड टॅक्सी सुटणार, BKC तील बहुचर्चित POD TAXI प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक
बीकेसीतील ट्रॅफीक जाम समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडी लंडनच्या धर्तीवर पॉड टॅक्सी प्रकल्प राबविणार आहे.
बीकेसी या व्यावसायिक केंद्राच्या ठिकाणी पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वांद्रे आणि कुर्ला अशा दोन्ही रेल्वे स्थानकांवरुन प्रवास करताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या दादागिरीला सहन करावे लागते.त्यामुळे या भागात लंडनच्या धर्तीवर पॉड टॅक्सी प्रकल्पाची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली होती.या पॉड टॅक्सी प्रकल्पाची अमलबजावणी करण्यासाठी आता एमएमआरडीएने 282 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत सवलतकार नेमण्यास मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प डीएफबीओटी ( डिझाइन-फायनान्स-बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर ) या तत्त्वावर आधारित आहे.
यासाठी एमएमआरडीएने सवलतकार म्हणून मे. साई ग्रीन मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी या प्रकल्पाच्या डिझाईन, इंजिनिअरिंग, डेव्हलपमेंट, कंन्स्ट्रक्शन, टेस्टींग, कमिशनिंग आणि ऑपेरशन आणि मेन्टेनन्स देखील डीएफबीओटी तत्वावर पाहणार आहे.
मे.साई ग्रीन मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची लंडनच्या हिथ्रो विमानतळावर राबविण्यात आलेल्या पॉड टॅक्सी योजनेची अमलबजावणी करणाऱ्या मे. अल्ट्रा पीआरटी यांच्यासोबत भागीदारी आहे. या पॉड टॅक्सीमुळे बीकेसीत दररोज प्रवास करणाऱ्या 4 ते 6 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.या पॉड टॅक्सी तंत्रज्ञानात दर 15 ते 30 सेंकदाला एक पॉड टॅक्सी सोडण्याची क्षमता आहे.त्यामुळे बीकेसीत जाणऱ्या प्रवाशांना वांद्रे आणि कुर्ला स्थानकांतून अवघ्या काही सेंकदाला पॉड टॅक्सीतून बीकेसीला पोहचता येणार आहे.
दर किमीला 21 रुपये देण्यास तयार
या बीकेसीतील ट्रॅफीक समस्येवर उतारा मिळविण्यासठी एमएमआरडीएने टेक्नो- इकॉनॉमिक फिजीबिलीटी स्टडी केला होता. त्यावेळी मे.टाटा कन्सलन्टींग इंजिनिअर्स संस्थेने या ठिकाणी पॉड टॅक्सी उभारण्याचा सल्ला दिला होता. बीकेसीत कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकातून बीकेसीला पोहचण्यासाठी सध्या मीटर ऑटो रिक्षा दर किमीला 15.33 रुपये आकारले जाते.तर शेअरिंगसाठी प्रति प्रवासी 20 ते 30 रुपये आकारले जाते. तर मीटर टॅक्सीसाठी दर किमीला 18.67 रुपये मोजावे लागते. तर ओला आणि उबर डायनामिक फेअर नूसार 2 ते 3 किमीच्या अंतरासाठी 80 ते 100 रुपये आकारात.सर्वेक्षणात 70% ऑटो वापरणारे तर 36% बसने प्रवास करणारे प्रवासी दर किमीला 21 रुपये देण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे.