गुलाबी वादळाची संभाजीनगरात दस्तक, भव्य बॅनरबाजी, महाराष्ट्रीय राजकारण्यांना साऊथ इंडियन पर्याय?
महाराष्ट्रात एंट्री घेण्यामागील केसीआर यांची गणितं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. पण सध्या तरीही महाराष्ट्रीयन नेते हा साऊथ इंडियन पर्याय कितपत स्वीकारतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला संभाजीनगरात गेल्या चार दिवसांपासून भगव्याऐवजी गुलाबी रंगाची तुफ्फान हवा आहे. शहरात जागोजागी बीआरएस पक्षाचे गुलाबी रंगाचे भव्य गोलाकार बॅनर्स लावण्यात आलेत. तर शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर लांबच लांब गुलाबी रंगाच्या पताका लावण्यात आल्यात. भारत राष्ट्र समिती अर्थात BRS पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी संभाजीनगरात ही जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातील नांदेडमधून एंट्री करत या गुलाबी वादळाने आता संभाजीनगरात दस्तक दिली आहे.
आज सोमवारी संध्याकाळी केसीआर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. देशाच्याच नव्हे तर जगात गाजलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेची झालेली वाताहत, भाजपचे नव-नवे धक्कातंत्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट या सर्व गदारोळात आता दक्षिणेकडील या पक्षानं महाराष्ट्रात एंट्री घेतली आहे.
लक्ष आज संध्याकाळच्या सभेकडे..
संभाजीनगर शहरातील जाबिंदा ग्राउंडवर बीआरएसची संध्याकाळी पाच वाजता सभा होत आहे. पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. तेलंगणातील विविध योजनांचे बॅनर्स संभाजीनगरात झळकवण्यात आले आहेत. शेतकरी आणि उद्योगांना मोफत वीज ही त्यातील सर्वात आकर्षक योजना चर्चेचा विषय ठरतेय. त्यामुळे महाराष्ट्रात एंट्री करताना आज सभेच्या माध्यमातून केसीआर जनतेला कोणतं आश्वासन देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठवाड्यातली तिसरी सभा
के चंद्रशेखर राव यांची ही मराठवाड्यातील तिसरी सभा आहे. नांदेडमध्ये पहिली सभा झाली होती. गेल्या महिनाभरातच संभाजीनगरातील महत्त्वाचे नेते केसीआर यांच्या गळाला लागले आहेत. यात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोळुंके, कदीर मौलाना यांच्यासह माजी आमदार अण्णासाहेब माने, संतोष माने, अभय पाटील चिकटगावकर, फिरोज पटेल यांच्यासह अनेक नेते भारत राष्ट्र समितीत दाखल झाले आहेत. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना, आप असा प्रवास केलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आता बीआरसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. हिंगोली आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत.
महाराष्ट्रीय नेत्यांना साऊथ इंडियन पर्याय
शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरण खूप बदलली आहेत. त्यातच विविध राजकीय आव्हानांसमोर टिकून राहण्यासाठी नेतेमंडळी वेगाने पक्ष बदलत आहेत. सत्ता अन् प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अनेक पक्षदेखील आपापल्या तत्त्वांना सोयीस्कर मुरड घालत आहेत. भूमिका बदलत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांची आणि नेत्यांची सरमिसळ झाल्याची दिसून येतेय. यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, अशा प्रमुख पक्षांमध्ये आता दक्षिणेकडील बीआरएसचा पर्याय राजकीय मंडळींसाठी खुला झालाय. महाराष्ट्रात एंट्री घेण्यामागील केसीआर यांची गणितं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. पण सध्या तरीही महाराष्ट्रीयन नेते हा साऊथ इंडियन पर्याय कितपत स्वीकारतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर जनतेवरही बीआरएसच्या आश्वासनांचा किती परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.