लाडक्या लेकीचा आगळा वेगळा सोहळा, शेतकरी बापानं केलेला विवाह चर्चेचा विषय, काय आहे कारण?
बुलढाणा येथील शेतकरी बापाने आपल्या लाडक्या लेकीचा विवाह अनोख्या पद्धतीने केल्यानं पंचक्रोशीतच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
संदीप वानखेडे, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा : आपल्या मुलीचा विवाह नेहमी आठवणीत राहावा आणि तो एकदम खास व्हावा यासाठी प्रत्येक मुलीचा बाप प्रयत्न करत असतो. त्यासाठी काही सामाजिक संदेश असो नाहीतर सामाजिक कार्य काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो. अशातच काही ठिकाणी तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नवरी मुलीला आणले जाते. अशातच एका शेतकरी बापाने अनोख्या पद्धतीने आपल्या लाडक्या लेकीचा विवाह केला आहे. त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पाच गावातील दहा हजार नागरिकासह गावातील जनावरांना चारा आणि मुंग्यानाही जेवण दिल्यानं हा विवाह सोहळा चर्चेचा विषय बनला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीचा केलेल्या शाही विवाहाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये परिसरातील पाच गावातील सर्व जातीधर्माच्या दहा हजार नागरिकांसह प्राणी आणि पक्षांनाही पंगत देण्यात आली आहे.
मोताळा तालुक्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय, तर या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप टाकण्यात आला होता.
परिसरातील पाच गावातील सर्वांना या लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. जवळपास दहा हजार लोकांना यामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. इतकच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्याना ही पंगत दिली आहे.
यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुखा चारा, परिसरातील श्र्वानाना जेवण इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली.
प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या कन्येचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी लावून दिला आहे. अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा लग्न सोहळा परिसरातील सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
एकुणच आगळा वेगळा केलेला हा विवाह सोहळा गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच मुलीच्या लग्नाला पंचक्रोशीतील नागरिक होतेच, परंतु वऱ्हाडी मंडळी, दोन कुटुंबातील नातेवाईकही आले होते. त्यामुळे हा सोहळा जिल्हयाबाहेरीही चर्चेचा विषय ठरत आहे.
मानवाबरोबरच पशू पक्षांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा शेतकरी बापाला सुचल्याने याबद्दल विशेष कौतुक होत आहे. बुलढाणा येथील अनोखा विवाह सोहळा याच कारणामुळे चर्चेत आला आहे.