भगर पीठ खाल्यानं 20 जणांना विषबाधा, एफडीएचे अधिकारी लागले कामाला
ज्यांनी भगरचे पीठ खाल्ले त्यांना त्रास झालाय. त्यांनी आपल्याच गावातील दुकानातून ते पीठ विकत घेतले होते. ज्या दुकानदारांनी पीठ विकत घेतले ते चिखली येथील दुकानदारांकडून विकत घेतले होते.
गणेश सोळंकी, बुलढाणा : भगर पीठ खाल्याने अनेक गावांतील लोकांना विषबाधा झाली. बाधित लोकांवर उपचार सुरू आहेत. बहुतांश दुकानदारांनी चिखलीमधून माल घेतला होता. भगत पीठ खाल्यानं हा त्रास झाला. त्यामुळं कोणत्या दुकानातून हे भगर पीठ आणले गेले होते. याचा तपास एफडीएचे अधिकारी करत आहेत. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
ऐन सणासुदीचे तोंडावर भगर पीठ खाल्याने चिखली तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील जवळपास 15 ते 20 लोकांना विषबाधा झाली. या सर्वांवर सध्या विविध खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
काल 21 सप्टेंबर रोजी एकादशी होती. अनेक लोकांनी उपवास ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांना उपवास असल्यामुळे त्यांनी भगर पीठ खाल्ला. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चकरा येण्यासारखे झाले.
काहींना वाटले की एसीडीटीमुळे हे सर्व होत असावे. परंतु तब्येत जास्त बिघडत असल्याने त्यांना चिखलीमधील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर लक्षात आले की भगर पीठ खाल्ल्याने यांना विषबाधा झाली. असे एकापाठोपाठ पंधरा ते वीस रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात भरती झाले. सर्वांना एकच त्रास होत आहे . सध्या सर्वाची तब्येत बरी असल्याचेही डॉक्टरांनी सांगितलंय.
ज्यांनी भगरचे पीठ खाल्ले त्यांना त्रास झालाय. त्यांनी आपल्याच गावातील दुकानातून ते पीठ विकत घेतले होते. ज्या दुकानदारांनी पीठ विकत घेतले ते चिखली येथील दुकानदारांकडून विकत घेतले होते. याचा तपास एफडीएचे अधिकारी करत आहेत. विषबाधेच्या घटनेनंतर नागरिक सावध झाले. या घटनेकडं गांभीर्यानं घेतलं जात आहे.