Buldhana Boy Drown : मित्रांसोबत पिकनिकला गेला तो परतलाच नाही, डोहात पोहण्याचा मोह जीवावर बेतला !
सुट्टी होती म्हणून मित्रांसोबत पिकनिकला गेला होता. यावेळी पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही. म्हणून मित्रांसोबत त्यानेही डोहात उडी घेतली. पण ही शेवटची उडी ठरली.
बुलढाणा / 7 ऑगस्ट 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामुळे पावसाळी पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहेत. मात्र अशा ठिकाणी पिकनिकच्या उत्साहात तरुणाई नको ते करते आणि दुर्घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत आहेत. मात्र तरीही पर्यटक काळजी घेताना दिसत नाहीत. प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र पर्यटकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अशीच एक एकदा बुलढाण्यात उघडकीस आली आहे. मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या 16 वर्षाच्या मुलाचा वारी हनुमान रांजण्या डोहात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पिकनिकला आला होता
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वारी हनुमान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे पाण्याचे डोह आहेत. शनिवार आणि रविवारी येथे अनेक पर्यटक पिकनिकसाठी आणि डोहात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येतात. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील 16 मुलाचा मुलगाही काल रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत वारी हनुमान येथे पिकनिकला गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडाला
रांजण्या डोहात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सदर मुलगा पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत मुलाला शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. तब्बल 18 तासांनंतर आज सकाळी मुलाचा मतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.