बुलडाणा : मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील आरोपानंतर ते नागपूर अधिवेशनात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, अब्दुल सत्तार २४ तास हसतमुख असतात. मजाक करत असतात. त्यांचा मजाकी स्वभाव आहे. मला ते काही अधिवेशनात नाराज वाटले नाही. गैरसमज होऊ शकतो किंवा विरोधी पक्षातल्या लोकांची खेळी असू शकते. शिंदे गटाचे सर्व लोकं एका जीवाचे, एका दिलाचे आहेत. त्यांचा संशय कुणावर असेल, तर मुख्यमंत्री शिंदे हे त्याचा शोध घेतील. काही खरं असेल, तर मुख्यमंत्री हे संबंधितांना योग्य ती समज देतील, असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं.
संजय गायकवाड यांनी यावेळी अजित पवार यांच्यावरही टीका केली. गायकवाड म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सभागृहात चुकून कळत नकळत काही वाक्य निघाली तेव्हा आरोप करत होतात. महापुरुषांचा अवमान झाला, असं म्हणता. आता तुम्ही संभाजी महाराज यांना धर्मवीर नाही, असं म्हणता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभं केलेलं स्वराज्य संभाजी महाराज यांनी राखलं. ते स्वराज्य रक्षक होते. धर्मासाठी त्यांची जीभ कापली. त्यांच्या डोळ्या, कानात शिश ओतलं. त्यांच्या अंगाची सालं काढली गेली. त्यांची नख उपटली गेली. भीमा-इंद्रायणीच्या नदीपात्रात त्यांची मान उडविली गेली.
संभाजी महाराज यांना धर्म बदलण्याकरिता भाग पाडलं. त्यांनी मरण पत्करला पण, धर्म बदलला नाही. त्यामुळं त्यांना धर्मवीर म्हंटलं गेलं. त्याकाळच्या मावळ्यांनी त्यांना धर्मवीर ही पदवी दिली. संभाजी राजे यांनी धर्माकरिता स्वतःचा जीव दिला. बलिदान दिलं त्यांनी असंही संजय गायकवाड यांनी अजित पवार यांना सुनावलं.