बुलढाण्यात 350 कट्टे रेशनचा तांदूळ धाड टाकून जप्त; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा काळाबाजार
नांदुरा येथील पांडुरंग लांडे यांच्या टीन शेडमध्ये लपवून ठेवलेला 350 कट्टे रेशनचा तांदूळ धाड टाकून जप्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकारे आणखी कुठे असा तांदूळ ठेवण्यात आला आहे का याचा तपासही सुरु करण्यात आला.
बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer) नसल्याने जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे काम कोलमडले आहे. एक महिना उशिराने होत असलेल्या धान्य पुरवठ्याचा गैरफायदा जिल्ह्यातील काही रेशन माफिया उचलत आहेत. त्यामुळे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशन धान्याचा काळाबाजार सुरू आहे. 28 मे रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव (Khamgaon) अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नांदुरा येथील पांडुरंग लांडे यांच्या टीन शेडमध्ये लपवून ठेवलेला 350 कट्टे रेशनचा तांदूळ धाड टाकून जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नांदुरा येथील पांडुरंग लांडे यांच्या टीन शेडमध्ये लपवून ठेवलेला 350 कट्टे रेशनचा तांदूळ धाड टाकून जप्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकारे आणखी कुठे असा तांदूळ ठेवण्यात आला आहे का याचा तपासही सुरु करण्यात आला. त्यामुळे या कारवाईनंतर बुल़ढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह
या कारवाईत पोलिसांनी जवळपास 175 क्विंटल रेशनचा तांदूळ तसेच 2 इलेक्ट्रॉनिक काटे असा एकूण 6 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या राशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुरवठा विभागावर ही यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिली आहे.
मोफत धान्य वाटपापासून काळाबाजार
कोरोनाच्या काळात सरकारकडून मोफत धान्य वाटप करण्यास सुरुवात केल्यापासून रेशनच्या काळा बाझार वाढला आहे. याबाबत बुलढाणा जिल्ह्यात कारवाई करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीही बुलढाण्यातील ग्रामीण भागात रेशनच्या काळाबाजाराबाबत कारवाई केल्यानंतर हे कनेक्शन गावागावापर्यंत पोहचले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अनेकदा माध्यमांतून आवाज उठवल्यानंतरही याबाबत कारवाई केली गेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कारवाई केली जाणे गरजेची
बुलढाणा जिल्ह्यात या प्रकारची कारवाई अनेक वेळा करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात राशनच्या धान्याचा काळा बाजार होत असल्याने मुळापर्यंत जाऊन ही कारवाई केली जाणे गरजेची असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.