Buldana ST | बुलडाण्यातील एसटीची महिन्याला 45 लाखांची बचत; 450 बसपैकी 150 बस सुरू, बचतीचे कारण काय?
सद्यस्थितीत 450 बसपैकी 150 बस सुरू असल्याने महिन्याकाठी 45 लाख रुपयांची बचत बुलडाण्यात होत आहे. बुलडाणा विभागातील 7 आगारातून सध्या दिवसाला 150 बस धावत आहेत. त्यांना 10 हजार 444 लिटर डिझेल लागते. लिटरला पंधरा रुपये जादा मोजल्यास एसटीला मोठा तोटा येतो.
बुलडाणा : केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलवरील अनुदानाबाबत निर्णय घेतल्याने डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. खासगी पंपाच्या तुलनेत शासकीय खरेदीसाठी लिटर मागे पंधरा ते सोळा रुपये जादा मोजावे लागत आहेत. यामुळे एसटी महामंडळाने (Corporation) खासगी पंपावरून डिझेल (Diesel) खरेदी (Shopping) करण्याचा निर्णय घेतलाय. सद्यस्थितीत 450 बसपैकी 150 बस सुरू असल्याने महिन्याकाठी 45 लाख रुपयांची बचत बुलडाण्यात होत आहे. बुलडाणा विभागातील 7 आगारातून सध्या दिवसाला 150 बस धावत आहेत. त्यांना 10 हजार 444 लिटर डिझेल लागते. लिटरला पंधरा रुपये जादा मोजल्यास एसटीला मोठा तोटा येतो. खासगी पंपावर डिझेल भरले जात असल्याने ही रक्कम वाचवण्यात बुलडाणा एसटी महामंडळला यश आले आहे. गेल्या साडेचार ते पाच महिन्यापासून एसटी महामंडळाला आंदोलनाची घरघर लागलीय. यातच पुन्हा इंधनाच्या दरात वाढत झाल्याने अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीला जास्तीचा भुर्दंड बसत होता.
सवलत देणाऱ्या पंपांवरून डिझेल
यातून मार्ग काढत 4 सदस्याच्या कमिटीने विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली खासगी पंपावरून डिझेल भरून घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आगारातील बसला त्यांच्या जवळच्या पंपावर डिझेल किरकोळ दराने मिळण्यासाठी पंपचालकांकडून कोटेशन मागवण्याचे काम सुरू होते. त्यात ज्या पंप चालकांनी किरकोळ दरात ही सवलत दिली अशा पंपावरून डिझेल भरून घेण्यास प्रारंभ झाला आहे.
750 कर्मचारी कामावर परतले
सध्या 150 बस जिल्ह्यात धावत आहेत. बसच्या नियमित 400 फेऱ्या होतात. या बस 47 हजार किलोमीटरचे अंतर कापतात. यासाठी दिवसाला 10 हजार 444 लिटर डिझेल लागते. जिल्ह्यातील सातही आगारातील 450 बस धावल्या तर 24 हजार लिटर म्हणजेच 2 टँकर डिझेल लागते. तर जिल्ह्यातील 7 आगारात असलेल्या तब्बल अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 750 कर्मचारी कामावर परतले आहेत. 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम घेण्यात आला आहे. हळूहळू कर्मचारी कामावर रुजू होत आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.