ग्रामीण भागात पाच जणांचा मृत्यू, ताप आला की लोकं घाबरतात, गर्भवती विवाहितेचा मृत्यू झाल्यापासून…
मागच्या कित्येक दिवसांपासून ताप येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी सुध्दा आरोग्य विभाग शांत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
गणेश सोळंकी, बुलढाणा : ग्रामीण भागासह आता चिखली (chikhali) शहरातही डेंग्यूचा (dengue symptoms) शिरकाव झाल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 5 जणांचा ताप आल्याने मृत्यू झाला आहे. तर चिखली शहरातील 14 वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे निदान झाल्यापासून लोकं प्रचंड घाबरली आहेत. डेंग्यूच्या उद्रेकाने चिखली तालुक्यात घबराहट पसरली आहे. आरोग्य विभागाकडून (health department) अजून पर्यंत कसल्याही प्रकारची जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरातील लोकं संताप व्यक्त करीत आहेत.
ताप आला की लोकं घाबरतात
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात डेंगू सदृष्य तापाने हैदोस मांडला आहे. भानखेड गावात दोन मुलांच्या आणि एका गर्भवती विवाहितेच्या मृत्यूनंतर चिखली शहरातही दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 14 वर्षीय मुलाचा मृत्यू हा डेंग्यू आजाराने झाला असल्याचे निदान झाल्याने एकच खळबळ माजली आहे. चिखली तालुक्यात अनेक गावात मोठ्या प्रमाणावर डेंगूचा प्रसार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात डेंगूचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळतंय. डेंग्यू आजारामुळे तालुकावासी चांगलेच घाबरले असून खाजगी आणि शासकीय रुग्णालयात ताप येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढलीय.
या करणामुळं लोकं चिडली
पावसाळ्यात किंवा पावसाळ्यापूर्वी अनेक आजार उद्धभवण्याची शक्यता असते. हवामान बदल होत असताना, अनेक आजार डोकेवरती काढतात असं अनेकदा पाहायला मिळतं. त्या अनुशंगाने आरोग्य विभाग लोकांना जागृत करण्यासाठी एखादी मोहिम राबवतात किंवा माहिती देतात. तशा पद्धतीचं काहीही बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी दिसत नसल्यामुळे लोकं आरोग्य विभागावरती संताप व्यक्त करीत आहेत.