“कुठल्याही क्षणी हे सरकार घरी जाऊ शकतं”; या आमदारानं भाकीत केलं…
पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली, मात्र हीच निवडणूक जर ईव्हीएमवर झाली असती तर कदाचित मी देखील आमदार झालो नसतो
बुलढाणा : देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे रोज नवनवीन घटना घडत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच काँग्रेसच्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे भाजप आणि काँग्रेस असा सामना आता रंगला आहे. काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकाही जोरदारपणे लढविण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे युद्ध रंगले होते. त्यावरून आता काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केंद्र सरकारवर अविश्वास दाखवत ईव्हीएम मशिनवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
तर दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपच्या सरकारविषयी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी आपल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी निवडणूक यंत्रणेवरच अविश्वास दाखवला आहे.
पदवीधर मतदार संघाची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली त्यामुळेच आपण आमदार झाल्याचे सांगत त्यानी ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचेच एक प्रकारे सांगितले आहे.
तर यावेळी ते म्हणाले की, पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली, मात्र हीच निवडणूक जर ईव्हीएमवर झाली असती तर कदाचित मी देखील आमदार झालो नसतो असा अविश्वासही त्यांनी ईव्हीएमवर दाखवला आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार धीरज लिंगाडे यांनी बोलतान महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधलाआहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सरकार कुठल्याही क्षणी घरी जाऊ शकतं असं भाकीतही अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता आमदार लिंगाडे यांच्या या वक्तव्यामुळे आणखी राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.