बुलढाणा : लग्न होणार म्हणून नटलेली नवरी होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. त्यावेळी तिच्या मनात ‘देर ना हो जाए, कही देर ना हो जाए’ असं गाणं सुरू असावं. पण लग्न होणार या खुशीने मित्रांच्यासोबत नवरा नाचत (Dancing) बसला. त्यावेळी तो मित्रांच्यासोबत खुशाल डान्स करीत होता. मुलगा येत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी (relatives) तात्काळ दुसऱ्या मुलाशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नवरीने चक्क नातेवाईकांना सुचविलेल्या नवरदेवाशी लग्न केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मलकापूर (malkapur) पांग्रा येथे घडली आहे
मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरात अत्यंत चर्चेचा ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात नवरदेवाला नवरी गमावण्याची वेळ आली आहे. लग्न मंडपात नवरदेव उशिरा आल्याने मुलीकडच्या नातेवाईकांनी नवरदेवासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ओळखीच्या नातेवाईकासोबत नवरीचे लग्न लावून दिले. 22 तारखेला त्यांचा विवाह होणार होता. दुपारी साडेतीनचा मुहुर्त ठरला होता. दिलेल्या वेळेच्या आत नवऱ्याकडील मंडळींनी पोहोचणं गरजेचं होतं. परंतु नवरदेव आणि त्याचे नातेवाईक वेळेत आले नाहीत. त्यामुळे मुलीकडचे नातेवाईक संतापले होते. नवऱ्याकडची मुलं मद्यधुंद अवस्थेत नाचत असल्याने चार तास लग्नाला विलंब झाला.
उशिर का झाला याचा जाब नवरीच्या नातेवाईकांनी विचारला. त्यावेळी दोन कुटुंबियांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे नवरीकडच्या मुलांनी तात्काळ त्यांच्या उपस्थित असलेल्या नातेवाईकासोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मुलासोबत लग्न लावत असल्याचे समजल्यावर नवऱ्याकडच्या लोकांनी तात्काळ तिथून पळ काढला.