बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. बुलडाण्यात तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आलाय. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे.
रविकांत तुपकर यांचा अन्नत्याग सत्याग्रह
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने तीनच दिवसांत व्यापक रुप धारण केले आहे. रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. 19 नोव्हेंबरला दिवसभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांनी चक्का जाम केला. तर काल सायंकाळी बुलडाण्यात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.
अन्नत्याग मंडपासमोर स्वाभिमानीचे पादाधिकारी शेख रफीक यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर त्यानंतर कार्यकर्त्यांनी चिखली रोडवर रास्ता रोको केला. याठिकाणी रविकांत तुपकर स्वतः रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्ते अजून संतप्त झाले होते. यावेळी पोलिसांची जीप सुद्धा फोडण्यात आली.
हे प्रकरण शांत झाले ही नव्हते की तेवढ्यात रात्री 11 वाजेच्या सुमारास बुलडाणा तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने तहसील कार्यालयात काही कर्मचारी काम करत असतांना ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी जीपकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या घटने नंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सोयाबीन कापूस आंदोलन आता पेटले असल्याचे यावरुन दिसतेय.
काय आहेत मागण्या ?
कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचा आज चौथा दिवस असून गावबंद आंदोलनाची घोषणा जरी केलेली असली तरी तुपकर त्यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
…अन् तुपकरांच्या आईने फोडला हंबरडा; माझ्या मुलाचे काही बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदारhttps://t.co/iwalRwtftQ#RajuShetty #ravikanttupkar #RavikantTupkaragitation
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या :
तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; वाशिममध्ये वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न