बुलढाणा (गणेश सोलंकी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मागच्या दोन दिवसांत शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसाचाराच गालबोट लागलं. दोन आमदारांची घर पेटवण्यात आली, बसेस जाळण्यात आल्या. टायर जाळून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. राजकीय पक्षांची कार्यालय फोडण्यात आली. एकूणच मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. राज्यात तणावपूर्ण बनलेल वातावरण शांत करण्यासाठी सरकारी पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील स्वत: हिंसाचार नको, शांततेत आंदोलन करा असं आवाहन करतायत. या परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने एक प्रक्षोभक वक्तव्य केलय. आता मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मध्ये कोणी आला , तर त्याच्या नरडीचा घोट घेईन असं या आमदाराने म्हटलं आहे.
असं आक्रमक वक्तव्य करण्याची या आमदाराची पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत. “आता मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मध्ये कोणी आला , तर त्याच्या नरडीचा घोट घेईन. त्याला फाडून खाईन, त्याचा जीव घेईन” असं धक्कादायक वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलय. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची काही दिवसांपूर्वी तोडफोड करण्यात आली. त्यावेळी सुद्धा या आमदाराने असच धक्कादायक वक्तव्य केलं होतं. “याची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होतं. हा संपला असता तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्याने कुणी केलं, मी त्याला सांगतो की बाबा कमी झालं. याची जरा व्यवस्था करायला पाहिजे होती”, असं संजय गायकवाड म्हणाले होते.
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या भावना तीव्र
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. ठिकाठिकाणी मराठा समाजाकडून निषेध, विरोध प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती थोडी बरी आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांनाच नको, तर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या. सरसकट सर्वांनाच द्या, हेच त्यांनी सांगितलं.