मनसे कार्यकर्त्यांचा चिखलीत ठिय्या, राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी
नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधवांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
बुलढाणा – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर इंग्रजांशी हातमिळवणी केल्याची टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. राहुल गांधी यांची शेगावला सभा झाली. या सभेत निषेध व्यक्त करण्यासाठी मनसे कार्यकर्ते व नेते शेगावच्या दिशेनं निघाले होते. चिखलीजवळ पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखलं. मनसेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत संघर्ष सुरू झाला. ताब्यात घेण्यापूर्वी कारणं सांगितल्याशिवाय सहकार्य का करायचं, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. चिखलीतचं मनसेनं घोषणाबाजी सुरू केली.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधवांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेगावला जाण्याची परवानगी पोलीस देत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दोन तासांत बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर नेत सोडून दिलं. महाराष्ट्रात येऊन सावरकर यांचा अपमान का केला. काँग्रेसनं आपल्या नेत्याला सांगितलं पाहिजे ना, असं अविनाश जाधव म्हणाले. महाराष्ट्रात सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार आहे. राहुल गांधी हे मुद्दामहून हे करत असतील, तर त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे हाती घेतले होते. पोलिसांनी रोखल्यानं मनसे कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या सभास्थळी जाता आलं नाही. सभेआधी राहुल गांधी गजानन महाराज यांच्या मंदिरात दर्शनासाठी आले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना इमारतीवरूनच काळे झेंडे दाखविले. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, मनसे कायमचं ड्रामा करते. हनुमान चालिसा किंवा भोंग्याचं राजकारण हे गेल्या अडीच वर्षात सुरू होतं. त्यामुळं आंदोलन किती करायची, कशी करायची. कुणासाठी करायची याचं त्यांचं एक कॅल्कुलेशन ठरलेलं असल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या.