Buldana Crime | चिखली येथे राऊत यांच्या घरी जबरी चोरी; चोरट्यांनी 10 लाख रुपयांचा ऐवज पळवला
चिखलीत 27 एप्रिलच्या रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर एक मेच्या रात्री पुन्हा घरफोडी झाली. अज्ञात आरोपींनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.
बुलडाणा : गेल्याच आठवड्यात सीसीटीव्हीत कैद दरोडेखोरांच्या चित्रफितीमुळे संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. असं असताना काल रात्री तीन वाजेच्या सुमारास संभाजीनगर भागातील विष्णू बळीराम राऊत यांच्या घरात जबरी चोरी (Theft) करण्यात आलीय. यामध्ये वडिलोपार्जित दागदागिण्यांसह सुमारे दहा लाख रुपयांपर्यंतचा ऐवज चोरट्यांनी पळवला. चिखली शहरातील संभाजीनगर परिसरात विष्णू राऊत (Vishnu Raut) राहतात. ते घराला बाहेरील बाजूस कुलूप लावून घराचे छतावर झोपले होते. यावेळी रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत राऊत यांचा मुलगा धनंजय झोपलेला होता त्याच्या पाया कडील बाजूच्या कपाटाची तोडफोड केली. चोरट्यांनी सुमारे दहा लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि दोन हजार रुपये नगदी स्वरूपाचा ऐवज चोरला. या चोरीची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. या प्रकरणाने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
तीन दिवसांपूर्वीच पाच घरी घरफोड्या
चिखलीत 27 एप्रिलच्या रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर एक मेच्या रात्री पुन्हा घरफोडी झाली. अज्ञात आरोपींनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी कपाटातील चपलाहार, गंठण, दोन अंगठ्या, नेकलेस, गहूपोत, झुंबर आदी साहित्य सुमारे वीस तोड्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी घटनेची पंचनामा केला. तपास ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रवीण तडी, पीआय विनोद ब्राम्हणे तपास करत आहेत.
चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त फेकले
चोरट्यांनी घरफोडी केल्यानंतर घरचे सर्व साहित्य फेकून दिले. विखरून ठेवून दिले. जे सापडले ते घेऊन पळाले. सकाळी उठताच ही बाब लक्षात आली. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. पण, या वाढत्या चोरीसत्रामुळं सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 27 एप्रिलच्या घटनेची चित्र सीसीटीव्हीत कैद झालीत. या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी बेपत्ता आहेत. त्यांनी ही घरफोडी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.