Sanjay Gaikwad | ‘गाडी तोडली ही शिक्षा कमी, याला संपवायला पाहिजे होतं’, शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Oct 26, 2023 | 3:50 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना थेट संपवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Gaikwad | गाडी तोडली ही शिक्षा कमी, याला संपवायला पाहिजे होतं, शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Follow us on

गणेश सोळंकी, Tv9 मराठी, बुलढाणा | 26 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या इमारतीजवळ जावून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यांच्या या कृत्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या या कृत्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. संजय गायकवाड यांनी मराठा तरुणांच्या कृत्याचं समर्थन केलंय. विशेष म्हणजे त्यांनी त्यापुढे जाऊन सदावर्ते यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

“गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या तोंडाचं आरक्षण हिसकावलं गेलं. याने इतक्या प्रखरपणे कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली, हा जणू काही असा सूडाने पेटलेला होता, मराठा आरक्षणाने याचं जसं काही प्रचंड मोठं नुकसान होणार आहे”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

‘याला संपवायला पाहिजे होतं’

“याची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होतं. हा संपला असता तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्याने कुणी केलं, मी त्याला सांगतो की बाबा कमी झालं. याची जरा व्यवस्था करायला पाहिजे होती”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केलीय की, ते शांततेने आंदोलन करणार आहेत. त्यांनी त्यांचं आंदोलन सुरु केलेलं आहे. आता काही उत्साही कार्यकर्ते आहेत जे गावागावामध्ये गावबंदीचं काम करत आहेत. पण अशी भूमिका घेऊ नये”, असं मत संजय गायकवाड यांनी मांडलं.

‘तो माणूस जीवावर खेळेल, पण…’

“एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितलं की, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठा आरक्षणासाठी समितीचा अहवाल येणं आणि इतर गोष्टींमध्ये वेळ चालला आहे. आरक्षण टिकवण्यासाठी हे सर्व चाललं आहे. घाईघाईत निर्णय घेतला आणि कोर्टात पुन्हा टिकलं नाही तर खूप मोठं नुकसान होईल”, अशी भूमिका संजय गायकवाड यांनी मांडली.

“पुढच्या काळात सरकार कोणाचं असेल, कोण मुख्यमंत्री होईल, आरक्षण मिळेल की नाही मिळणार, हे सांगता येणार नाही. सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून ओळखतो. तो माणूस जीवावर खेळेल. पण शब्द पडू देणार नाही. प्राण जाये पर वचन ना जाये अशा स्वरुपाचे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.