शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने संजय राऊत यांचा केला एकेरी उल्लेख, म्हणाले, ‘पिसाटलेला कुत्रा’, ‘पागल’, आणि बरंच काही…
"संजय राऊत यांनी शिवसेना फोडली. आता ते आघाडीची सुद्धा बिघाडी करणार. याच्या फाटक्या तोंडाला काही कंट्रोल नाही. काही विचारात नाही, काही नाही आणि 'सामना'मध्ये विश्लेषण करतो. हा चमचेगिरी करतो कशाला?", अशा खोचक शब्दांमध्ये संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
बुलढाणा : महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला नेहमी दिला जातोय. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आणि परंपरा असल्याचं मानलं जातं. पण सध्या ही परंपरा आणि संस्कृती आता कोणत्या स्तरावर चालली? हा मोठा प्रश्न आहे. कारण राज्याच्या राजकारणातील नेत्यांची भाषा आता अतिशय खालच्या दर्जावर जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा एक अर्वाच्य शिवीगाळचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे.
विशेष म्हणजे देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तसेच मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान आता राजकीय नेत्यांची भाषा किती टोकाच्या स्तारावर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकतंच संजय गायकवाड यांनी आज संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
“संजय राऊत यांनी शिवसेना फोडली. आता ते आघाडीची सुद्धा बिघाडी करणार. याच्या फाटक्या तोंडाला काही कंट्रोल नाही. काही विचारात नाही, काही नाही आणि ‘सामना’मध्ये विश्लेषण करतो. हा चमचेगिरी करतो कशाला? तू राष्ट्रवादीवाल्यांचा काही मालक आहे का? तू दुसऱ्या पक्षात का लुडबुड करतो? तुझी सवय जात नाही का?”, असे सवाल करत संजय गायकवाड यांनी राऊतांवर निशाणा साधला.
“खारघरची घडलेली घटना नैसर्गिक आहे. 25 लाखांचा मॉब त्याठिकाणी असल्याने तिथे आवाज पोहोचणे कठीण होते. ज्यांना अस्वस्थ वाटलं त्यांना दवाखण्यात नेलं गेलं. संजय राऊत हा माणूस पागल आहे. काही निमित्त भेटलं की बडबड करतो. त्याच्या आरोपात काही तथ्य नाही. त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“संजय राऊतला कंटाळून सगळेच पक्ष बाहेर पडतील. वीट आलाय त्याचा..सकाळी त्याचे तोंड दिसले की, लोक टीव्ही बंद करतात. काहीही आधार नसतो त्याच्या बोलण्याला. मनात वाटेल ते बडबड करतो. पागल, पिसाळलेल्या कुत्र्यासारखा. त्याने शिवसेनेची वाट लावली. आता सगळ्या पक्षांची वाट लावणार आहे”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
संजय गायकवाड यांनी यावेळी नुकसानग्रस भागातील शेतकऱ्यांना मदतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. “ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाली त्याठिकाणी आमचे आमदार, खासदार जाऊन आले. त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले. मदतीसाठी मुख्यमंत्री उमुख्यमंत्री यांना आवाहन केले. पंचनामे झाल्यावर मदत मिळेल. एका पालकमंत्र्याकडे जर चार-चार जिल्हे असतील तर ते पोहचत नाही. पण आम्ही सक्षम आहोत. ज्यावेळी आम्ही कमी पडू त्यावेळी पालकमंत्र्यांना बोलावू”, अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली.