बुलढाणा अपघात अपडेट, ‘त्या’ अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, काय घडलं नेमकं?
25 जणांचा बळी गेलेल्या बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताबाबत अंतिम फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे.
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी झालेल्या खाजगी बसच्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताने राज्यात एकच खळबळ माजली होती. 25 निष्पापांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘ती’ ट्रॅव्हल्स ओव्हरटेक लेनमधून धावत असल्याचा खुलासा अहवालात झाला आहे. फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
काय म्हटलंय अहवालात?
अहवालातील माहितीनुसार अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती, जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे. अपघाताच्या वेळी बसची गती 70 ते 80 किलोमीटर प्रति तास होती. अपघातग्रस्त बसचे समोरचे चाक सुरुवातीला साईन बोर्डला धडकले. त्यानंतर बस 10 फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला. टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आली. बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन उलटली.
बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाला आणि डिझेल टँकवर आदळला. त्यामुळे डिझेल टँकमधले 350 लिटर डिझेल सर्वत्र सांडले. डिझेल इंजिन हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि बसने पेट घेतला. वाहतुकीचे नियम मोडून ही बस धावत होती, असा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे. या बसची पीयुसी प्रमाणपत्राची मुदतही 31 मार्चपर्यंत होती.