राज्यपालांना हे कळायला पाहिजे की…, संजय गायकवाड यांचा हल्लाबोल
या राज्यपालाला आपल्या राज्याचा इतिहास माहीत नाही. या राज्यपालांना राज्य काय आहे हे कळत नाही.
बुलडाणा : भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. कोश्यारी यांनी यापूर्वी तीन-चार वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल त्याचं राज्याच्या राज्यपालांनी एकेरी उल्लेख करणं कितपत योग्य आहे, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.
ज्यांना छत्रपती म्हटलं जातं त्यांना एकेरी भाषेत शिवाजी म्हणतात. शिवाजी जुने झाले. या राज्यपालांना कळायला पाहिजे की, शिवविचार हा कधी जुना होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगातल्या कोणत्याही महापुरुषाशी करता येऊ शकत नाही, असं मतही संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.
या राज्यपालाला आपल्या राज्याचा इतिहास माहीत नाही. या राज्यपालांना राज्य काय आहे हे कळत नाही. अशा व्यक्तीला राज्यपाल पदावर ठेवून काही उपयोग नाही. मराठी मातीतला माणूसच राज्यपाल पदी ठेवावा, अशी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना संजय गायकवाड यांनी विनंती केली. या राज्यपाल कोश्यारी यांना दुसरीकडं पाठवावं, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही या वादात उडी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे राज्य खपवून घेणार नसल्याचंही संजय गायकवाड म्हणाले.