खेळता खेळता चिमुकल्याचा अचानक श्वास अडकला, पटकन डॉक्टरकडे नेलं, एक्सरे पाहून मम्मी-पप्पा हादरले!
खेळता खेळता गिळलं नाणं! चिमुरड्याचा एक्सरे पाहून मम्मी पप्पांच्या काळजात धस्स...
गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा : लहान मुलांवर बारीक लक्ष सतत का ठेवलं पाहिजे, जे अधोरेखित करणारी आणखी एक घटना बुलढाण्यातून (Buldana) समोर आली आहे. एका चिमुरड्याचा अचानक श्वास अडकला. आईने पाहिलं तर तिलाही काही सुचेना. काळज्याच्या तुकड्याला श्वास घ्यायला (Breathing Problem) अडचण येतेय, हे पाहून चिमुरड्याच्या मम्मी पप्पांना काही सुचेनासं झालं. अखेर त्याला लगे डॉक्टरकडे नेलं. तिथे गेल्यावर कळलं की, 3 वर्षांच्या या चिमुकल्याने चक्क एक रुपयाचं नाण गिळलं (Kid Swollen coin) होतं.
धक्कादायक बाब म्हणजे या नाण्यामुळे त्याचा श्वास गुदमरला होता. आईवडिलांनी जेव्हा या मुलाचा एक्सरे रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ही घटना बुलडाण्याच्या शेगाव शहरात घडली.
खेळता खेळता गिळलं
तीन वर्षांचा मोहम्मद आशिर मोहम्मद आमिर हा खेळत होता. खेळता खेळता त्याच्या हाताला एक रुपयांचं नाणं लागलं. त्याला वाटलं खायची गोष्ट आहे म्हणून त्याने ते नाणं तोंडात टाकलं.
आई वडिलांचं चिमुरड्या आमीरकडे लक्ष नव्हतं. नेमक्या त्याच क्षणी या चिमुरड्याने तोंडात घातलेलं एक रुपयांचं नाणं गिळलं. पण यानंतर जे घडलं, त्याने त्याच्या आईवडिलांना घाम फोडला होता.
लहान मुलांनी नाणी गिळल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. पण नाणं गिळून पोटात गेल्यानंतर काय करायचं हे डॉक्टरांना माहीत आहे. अशा मुलांना डॉक्टर प्रचंड प्रमाणात केळी खायला सांगतात. त्यानंतर हे नाणं विष्टेद्वारे बाहेर पडल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.
डॉक्टरांनी काय केलं?
मात्र या तीन वर्षांच्या चिमुरड्याची केस वेगळी होती. नाणं या बाळाच्या पोटात न जाता, ते त्याच्या श्वसन नलिकेजवळ अडकलं होतं. एक्सरे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही हे केस साधीसुधी नाही, हे लक्षात आलं.
तीन वर्षांच्या बाळाला होणारा त्रास पाहून डॉक्टरांना अखेर हे नाणं बाहेर काढण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. डॉक्टरांनीही प्रयत्नांची शर्थ केली. फोलिज कॅथेटरच्या मदतीने डॉक्टरांनी हे नाणं तत्काळ काढण्याचा प्रयत्न केले. त्यामुळे या बाळाचा जीव अगदी थोडक्यात वाचला.
चिमुकल्याला वाचवण्यात यश आल्यामुळे या बाळाला पालकांना सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनं लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त केली जातेय. थोडक्यात निभावल्यानं या चिमुरड्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांचेही आभार मानलेत.