बुलढाण्यासह चिखलीत अवकाळी पाऊस; हरभरा, गहू, कांदा पिकांचे होणार नुकसान…
गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटं आली आहे. सगळ्यात आधी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले होते.
बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीसह परिसरात अनेक ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसानं शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, कांदा सह इतर पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काल रात्रीसुद्धा चिखलीसह परिसरातील अनेक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हवामान खात्यानेसुद्धा पावसाची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार आज पावसाला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यासह परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसभरात पाऊस कधीही कोसळ्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत होते.
याआधीच गेल्या दोन वर्षापासून पावसामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सगळी पिकं पाण्यात सोडून देण्याची वेळ आली होती. कधी नैसर्गिक संकट तर कधी बाजारभावामुळे शेतकरी नेहमी अडचणीत आला आहे.
गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटं आली आहे. सगळ्यात आधी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले होते. त्यातच अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा कसा होणार असा सवाल आता शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.
मागील दोन दिवसांपासून दिल्लीपासून हवामानात बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यानंतर आता राज्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हरभरा, गहू, कांदा या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
बुलढाण्यासह परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाकडून वारंवार नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी आता शेतातून पीकपाणी घ्यायचं की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.