भाजपकडून हिंसा, भीती पसरविली जातेय, राहुल गांधी यांचा घणाघात
देशातील प्रत्येक भागात भाजपनं हिंसा पसरविली. भीती पसरविली आहे. या विरोधात ही यात्रा सुरू केली.
शेगाव : पिकाला योग्य भाव हवा, विम्याचे पैसे हवेत, तर शेतकरी सुखी आणि समाधानी होतील, असा सल्ला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेगाव येथील सभेत दिला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत गजानन महाराजची की जय, या शब्दानं केली. राहुल गांधी म्हणाले, ७० दिवसांपूर्वी ही यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाली. समुद्रकिनाऱ्यावर यात्रेला सुरुवात झाली. रोज २५ किलोमीटर ही यात्रा सुरू राहते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आता महाराष्ट्रात आहे.
विरोधी पक्षानं प्रश्न विचारला की, यात्रेची आवश्यकता का, यावर राहुल गांधी म्हणाले, देशातील प्रत्येक भागात भाजपनं हिंसा पसरविली. भीती पसरविली आहे. या विरोधात ही यात्रा सुरू केली. यात्रेचा अर्थ तुमचं म्हणणं ऐकणं आहे. तुमचं दुःख समजून घेण्याचा आहे. नफरतीमुळं लोकं तुटतात. पण, प्रेमातून लोकं जुळतात, असही त्यांनी सांगितलं.
या भागात गेल्या सहा महिन्यात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामागचं कारण काय. कोणत्याही शेतकऱ्याशी बोला. ते सांगतात, योग्य भाव मिळत नाही. विम्याचे पैसे भरले. एक रुपया मिळाला नाही. शेतकरी आत्महत्या का करतो. ५० हजार रुपये, एक लाख रुपयांचं कर्ज असते म्हणून. व्यापाऱ्यांचे पैसे कसे माफ होतात. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.
विदर्भात शेतकरी आत्महत्या होत होत्या. दिल्लीतील काँग्रेस सरकारनं विदर्भाला पॅकेज दिलं होतं. दुख कसं मिटतं. प्रेम केल्यानं, गळाभेट घेतल्यानं मिटतं. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. ते शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकतील, तर मदत करतील, अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.