Cabinet Meeting : विधानसभा बरखास्तीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत नाहीच, उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, अनेक मंत्री गैरहजर
राज्यात जोरदार राजकीय उलथापालथ होत असताना आणि सरकार केव्हाही गडगडेल असे वाटत असताना आज कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत विधानसभ बरखास्तीचा निर्णय होईल असे वाटत असताना या विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे अजूनही सरकार वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते.
राज्यातील राजकारणात वादळं आलं असताना आजची कॅबिनेटची बैठक (Cabinet Meeting) वादळी ठरण्याचा अंदाज बांधल्या जात होता. तसेच या बैठकीला कोण कोण हजर राहते. याचीही चर्चा होती. ही बैठक म्हणजे सरकारच्या राजीनाम्याची रंगीत तालीम मानण्यात येत होती. मात्र या सर्व तर्कवितर्कांना कॅबिनेट बैठकीत पूर्णविराम मिळाला. या बैठकीत सरकार बरखास्तीचा (Assembly dismissed) ब्र सुद्धा काढण्यात आला नाही. सरकार पडण्याविषयी बाहेर जोरदार चर्चा रंगलेली असताना बैठकीत याविषयीचे काहीच पडसाद बघायला मिळाले नाहीत. नेहमीप्रमाणे ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakeray) हे ऑनलाईन (Online) उपस्थित होते. तर आघाडीतील इतर घटक पक्षांचे नेते ही हजर होते. कॅबिनेटच्या बैठकीतील शिवसेनेच्या बंडखोरातील मंत्र्यांसोबतच इतर अनेक मंत्री सुद्धा गैरहजर होते. कॅबिनेट बैठकीत बंडखोरीचे पडसाद बघायला मिळतील असे वाटत होते. मात्र उपस्थित मंत्र्यांनी याविषयी काहीच भाष्य केले नाही. या बैठकीत काही निर्णय सुद्धा घेण्यात आले.
मुखमंत्र्यांच्या चेह-यावर तणाव नाही
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी त्यांच्या चेह-यावर कुठलाही तणाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती बैठकीत उपस्थित मंत्र्यांना दिली. तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी विचारणा केली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ही बैठक नेहमीप्रमाणे झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच मास्क लावणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सहकार्य असू द्या
राज्यातील नाराजी नाट्यादरम्यान आणि मविआ सरकार अडचणीत आलेले असताना आजची कॅबिनेट बैठक वादळी होण्याची चिन्हं होती. त्यातच संजय राऊत यांनी केलेल्या टि्वटवरुनही आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने आजची बैठक वादळी ठरेल असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतू बैठकी नेहमीप्रमाणे पार पडली. या बैठकीत काही निर्णय ही घेण्यात आले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षाचे मंत्री या बैठकीला हजर होते. परंतु, त्यांचे प्रमाण कमी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य असू द्या अशी भावनिक साद घातली. त्यामुळे उपस्थितांमध्ये शांतता पसरली.