मुंबईत हॉटेलमध्ये जेवायला गेले, शेफचा पगार ऐकून… नितीन गडकरी यांनी सांगितलेला किस्सा काय?
"अनेक मुली एअर इंडिया, इंडिगो सारख्या विमानांमध्ये काम करतात. आपल्या मुलांना उत्तम कौशल्य कस मिळेल यासाठी योजना सुरू करण्याची गरज आहे", असेही नितीन गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेकदा त्यांच्या आयुष्यातील खासगी किस्से सांगत असतात. नुकतंच नितीन गडकरींनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना शिक्षण करिअर याचे महत्त्व सांगितले आहे. यावेळी त्यांनी हॉटेलमधल्या एका शेफचा पगार किती असतो, याचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. “आदिवासी मुलांनी खेळामध्ये मोठ्या प्रमाणात प्राविण्य प्राप्त केलं आहे. त्यांनी आपली क्षमता सुद्धा दाखविली. आम्ही आदिवासी मुलांसाठी त्या भागात शाळा सुरू केल्या. इतर मुलांच्या तुलनेत आदिवासी मुलांमध्ये खेळाची मोठी ताकद असते. आपला विकास झाला पाहिजे, अशी चर्चा सगळे करतात. मात्र विकास कसा झाला पाहिजे, यावर चर्चा कोणी करत नाही”, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
“आदिवासी मंत्री हे एका कॉलेजच्या प्राचार्य होते. मीच त्यांना राजकारणात आणलं. त्यामुळे मी त्यांना सांगतो आपल्या मुलीला डॉक्टर इंजिनियर कशा झाल्या पाहिजे, यूपीएससी पास कसे झाल्या पाहिजे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्याचे संबंधित ट्रेनिंग आदिवासी मुला-मुलींना उपलब्ध करून दिलं पाहिजे. आश्रम शाळांचं रेटिंग केलं पाहिजे. ज्यांचं रेटिंग चांगला आहे, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचे इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी मदत केली पाहिजे. एक चर्मकार समाजाची मुलगी माझ्याकडे आली होती ती एअर होस्टेस म्हणून सिलेक्ट झाली होती. अनेक मुली एअर इंडिया, इंडिगो सारख्या विमानांमध्ये काम करतात. आपल्या मुलांना उत्तम कौशल्य कस मिळेल यासाठी योजना सुरू करण्याची गरज आहे”, असेही नितीन गडकरी म्हणाले.
“सगळे पैसे आपल्या खिशात घालू नका”
“शाळा, कॉलेज आणि आश्रम शाळा आमदारांना आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका. मी पण वाटल्या माझ्या काळात पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की चांगलं काम करा. विद्यार्थ्यांना शिकवा. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. शाळा चांगल्या करा, त्यानंतर दोन पैसे आपल्या खिशात घाला. पण सगळे पैसे आपल्या खिशात घालू नका. विद्यार्थ्यांना चांगलं नागरिक घडवता आलं. रेटिंग ठेवा. स्पर्धा असली पाहिजे. मुलांना मंत्र्यांच्या शिफारशीने सिलेक्ट करू नका, तर रेटिंग देऊन त्या सुधाराव्यात. त्याची गुणवत्ता सुधारेल तर भविष्यातले अनेक चांगले खेळाडू संशोधक आणि मुलं तयार होतील”, असेही नितीन गडकरींनी सांगितले.
तुला पगार किती भेटतो? नितीन गडकरींनी सांगितला किस्सा
“मुंबईमध्ये मी एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. त्या हॉटेलमध्ये एक शेफ आहे. त्याचं नाव डेविड आहे. तो हाँगकाँगचा आहे. त्याला मी विचारलं की तुला पगार किती भेटतो? त्यावर त्याने मला 15 लाख रुपये महिना पगार मिळतो, असे सांगितले. आता यावरुन उदाहरण घ्या की एका शेफला पंधरा लाख रुपये पगार मिळतो, यात त्याचा कौशल्य आहे. ज्याची गुणवत्ता आहे, त्याच्याकडे लोक जातात”, असे नितीन गडकरी म्हणाले.
“काल परवा मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये प्रकल्पाचे उद्घाटन केलं. तो प्रकल्प आणण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेतली. तिथे एक स्टीचिंगचा प्रकल्प उघडला. स्टिचिंग करण्याचा तिथे मुलं मुली काम करतात. त्यांना साऊथ आफ्रिकेतून ऑर्डर मिळाली. तिथे वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर काढले, दहा हजार मुलांना तिथे रोजगार मिळाला. पाच ते सहा हजार आदिवासी होते ते दिशाभूल होऊन नक्षल चळवळीकडे वळले होते. ते आता उत्तम नागरिक बनले हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपण रोजगार निर्माण केला पाहिजे. रोजगार निर्माण करण्यासाठी विकासाचा समाजकारण केलं पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे”, असेही नितीन गडकरींनी सांगितले.
“…तर मी कदाचित क्रिकेटर झालो असतो”
“मी शाळेत असताना क्रिकेट खेळतो मी भाषण देत नव्हतो एक स्पर्धा झाली. तेव्हा एक मुलगी भाषण देत होती. आमच्या शाळेत त्या मुलीच्या भाषणात एक शब्द चुकला तर काही विद्यार्थ्यांनी तिला चिडवलं. तेव्हा मास्तरने आम्हाला बोलावून धुलाई केली आणि सांगितलं त्या मुलींमध्ये भाषण देण्याची डेअरिंग तरी आहे. तुमच्यामध्ये ते सुद्धा नाही. तेव्हापासून मी भाषण द्यायला लागलो. त्यांनी मला मारलं नसतं आणि रागावलं नसतं तर मी कदाचित क्रिकेटर झालो असतो पण वक्ता झालो नसतो”, असा किस्साही नितीन गडकरींनी सांगितला.