मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; दादर, घाटकोपर, ठाणे स्थानकावर हजारो प्रवाशी खोळंबले
कामावरुन घरी निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन उशीराने धावत आहेत.
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. दादर, घाटकोपर, ठाणे स्थानकावर हजारो प्रवाशी खोळंबले आहेत. यामुळे कामावरुन घरी निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन उशीराने धावत आहेत.
कल्याण-सीएसएमटी धीम्या मार्गावरून जाणाऱ्या लोकल घाटकोपर स्थानकात येत असताना पेंटोग्राफ मध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल काही काळ थांबवण्यात आल्या होत्या.
20 ते 25 मिनिटे लोकल खोळंबल्या होत्या. बिघाड दुरुस्त करून लोकल धीम्या गतीने मार्गस्थ झाल्या. परंतु या बिघाडमुळे ठाणे कडून कल्याणला जाणारी वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचे पहायला मिळत आहे. दुरुस्ती आणि देखरेखीसाठी प्रत्येक रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक तसेच रेल्वे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे मध्य रेल्वेचे प्रवासी संतापले आहेत.