लोकल प्रवाशांनो सावधान, कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी पॉवर ब्लॉक
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी गर्डरची उभारणी करीत आहे. त्यामुळे या सेक्शनमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी असे तीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शनिवारी रात्री आणि रविवारी प्रवास करताना लोकल गाड्यांची स्थिती जाणूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल बंद असणार आहेत.
मध्य रेल्वे कसारा रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करीत आहे. या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने लागोपोठ तीन पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉवर ब्लॉकच्यामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. शनिवार दिनांक ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डर ( टप्पा-१ ) च्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे कसारा स्थानकावर शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.




पहिला ब्लॉक शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवार दि. ०९.०३.२०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४.०० ते संध्याकाळी ४.२५ पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांचे शार्ट टर्मिनेशन-ओरिजिनेशन
शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-११) आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाणार आहे.
रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी दुपारी १.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-१९) कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाईल.
कसारा येथून शनिवारी दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवारी दि.०९ मार्च २०२५ सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटणार आहे. कसारा येथून रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०४.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटणार आहे.
मध्य रेल्वेचा रविवारी ०९ मार्च रोजी मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेने मुंबई डिव्हीजनने रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी उपनगरीय मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक घेणार आहे.
माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनूसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या नेहमीच्या थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर स. ११.१० ते सायं. ४.४० वाजेपर्यंत – लोकल फेऱ्या रद्द –
स. ११.१० ते सायं. ४.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स. ११.१६ ते सायं. ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स. १०.४८ ते सायं. ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल -कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या
हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकातून त्याच पासावर प्रवास करण्याची परवानगी आहे.