नाशिक: मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ते नाशिकमध्ये बोलत होते. “माझ्याकडे सध्या अधिकृत माहिती नाही. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर ओबीसीचं जे आरक्षण आहे, त्याला धक्का लावू नका. ती गोष्ट सर्व पक्षांना मान्य आहे. ओबीसीचं जे मूळ आरक्षण आहे, त्याला धक्का न लावता आरक्षण द्यावं, याला सगळ्यांचा पाठिंबा आहे. मागासवर्ग आयोगाचा अधिकृत रिपोर्ट काय येतो आणि त्याहीपेक्षा सरकार त्यावर काय निर्णय घेतं, त्यानंतर मला त्याबाबत अधिक बोलता येईल”, असं भुजबळ म्हणाले.
“आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. सरकारच्या भूमिकेनंतर याबाबत अधिक बोलेन” – छगन भुजबळ
यावेळी भुजबळांनी नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याबाबत अधिवेशनात बोलणार असल्याचं सांगितलं. पुत्र पंकज भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात बाळासाहेबांना दिलेल्या आदरांजलीच्या होर्डिंगची छगन भुजबळांनी पाठराखण केली. ठाकरे परिवारासोबत कौटुंबिक संबंध असल्याचं भुजबळ म्हणाले.
‘ मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची शिफारस’
मराठा समाजाला इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने राज्याच्या सचिवांकडे सोपवला आहे. आता या अहवालाचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर मुख्य सचिवांचे या अहवालावर जे टिपण येईल, त्याआधारे मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाणार आहे.
मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा अभ्यास कोण कोण करणार?
मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत मुख्य सचिवांसह इतर पाच विभागांचे सचिव असतील.
आरक्षणासाठी संवाद यात्रा सुरु
मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. आता आरक्षणासाठी मराठा समाज अधिक आक्रमक झालाय. आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून मराठा संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून यात्रेला सुरुवात करण्यात आली. आजपासून सुरू होणारी यात्रा 26 तारखेला विधानभवनावर धडकणार आहे.
संवाद यात्रेचा उद्देश काय?
जनसंवाद यात्रेतून मराठा समाजातील प्रत्येक समुहाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे. आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या असो, किंवा इतर सामाजिक प्रश्न, सर्व गोष्टींची यातून जाणिव करुन दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि औरंगाबादमधून ही संवाद यात्रा निघणार आहे.
मुंबईत आझाद मैदानावर उपोषण
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरही बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज 16 वा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यासही नकार दिलाय. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि इतर मागण्याही मान्य व्हाव्यात, यासाठी हे उपोषण सुरु आहे.
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षण : अहवाल आला, आता अहवालाचा ‘अभ्यास’ सुरु
मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, पुढे काय?
मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 26 लाखांचा खर्च
मराठा आरक्षण: उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली
‘त्याच दिवशी’ फडणवीस म्हणाले होते, ‘हे आरक्षण घटनाविरोधी, कोर्टात टिकणार नाही’