Chhagan Bhujbal : मला ना मंत्रीपद, ना आमदारकीची पर्वा; छगन भुजबळ असं का म्हणाले ?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज अचानक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यानुषंगाने दोन समाजात निर्माण झालेली तेढ यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. ही राजकीय भेट नव्हती. एका सामाजिक प्रश्नावरची ही भेट होती, असंही भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. राज्यात मराठा अणि ओबीसींमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आहे. तणावाची आणि स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नात पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. शरद पवार यांनीही भुजबळ यांची ही विनंती मान्य केली आहे. तसेच येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांना फोन करून या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मिटिंग घेणार असल्याचं आश्वासन शरद पवार यांनी भुजबळांना दिलं. तसेच या प्रकरणात कोणतंही राजकारण नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निव्वळ सामाजिक प्रश्न आहे. हा राजकीय प्रश्न नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी सामाजिक प्रश्नच म्हणून पाहावं, असं सांगतानाच हा राजकारणाचा विषय नाही. मी सभागृहातील गोष्टी भाषणात बोललो. मी परत सांगतो. मला राजकारणाची पर्वा नाही, ना मंत्रीपदाची, ना आमदारकीची. राज्य शांत राहिलं पाहिजे. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये हे माझं मत आहे. त्यामुळे मी जाहीरपणे बोललो आणि साहेबांकडेही बोललो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
पटेल म्हणाले, जा…
तुम्ही शरद पवार यांना भेटायला जात असताना त्याची कल्पना अजित पवार यांना दिली होती का? असा सवाल छगन भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. मी पक्षामध्ये कुणाशीही चर्चा केली नाही. फक्त प्रफुल्ल पटेल यांना फोन करून सांगितलं. शरद पवार यांना का भेटत आहे? त्यांच्याशी काय चर्चा करणार आणि कोणत्या विषयावर चर्चा करणार हे मी त्यांना सांगितलं. तसेच माझ्याकडे असलेली कागदपत्रे पवारांना देणार असल्याचंही पटेल यांना सांगितलं. त्यावर पटेल यांनी भेटायला जा म्हणून सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दीड तास चर्चा
मी शरद पवार यांच्याशी दीड तास चर्चा केली. कुठे कुठे काय काय झालं हे त्यांना सांगितलं. वकिलांची भूमिका काय आहे हेही सांगितलं. तसेच धनगर आरक्षणावरही चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी मला काही सूचना केल्या. आमची साधकबाधक चर्चा झाली. शरद पवार या प्रकरणात लक्ष घालायला आणि पुढाकार घ्यायला तयार आहेत. खुली चर्चा होणं कठिण आहे. त्यामुळे दोन चार लोकांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सर्वांशी चर्चा करताना प्रश्न सुटण्याऐवजी अवघड होतात. म्हणूनच आधी हा प्रश्न समजून घेतो असं पवार म्हणाल्याचंही त्यांनी सांगितलं.
राजकारण करायचं नाही
शरद पवार यांना केवळ दोन समाजातील दरी दूर व्हावी म्हणून भेटलो. त्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. राज्यातील वातावरण शांत राहावं, हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. हे मी शरद पवार यांनाही सांगितलं. त्यावर शरद पवार यांनीही, मीडियाला सांगा आम्ही या प्रश्नात राजकारण आणणार नाही. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून दोन चार लोकं आधी चर्चा करू. प्रश्न समजून घेऊ, असंही भुजबळ म्हणाले.